लोकशाही न्यूज नेटवर्क
लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझा नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करिन, अशी धमकी देत एका नराधमाने ३५ वर्षीय विवाहितेवर सलग ७ वर्ष अत्याचार केला. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद मुंजा पराड (रा. शिक्षक कॉलनी, मंजरथ रोड) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय विवाहितेचे लग्न झालेलं असून ती बीडच्या माजलगाव तालुक्यात राहते.
आरोपी आणि पीडितेने लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नानंतर पीडितेने आरोपीसोबत संबंध तोडले, मात्र आपले लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझ्या नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करिन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरु केले. एवढेच नाही तर, तिला शारीरिक संबंधांसाठी सुद्धा प्रवृत्त केले. २०१६ पासून आरोपीचे हे कृत्य सुरु होते. अखेर आरोपीच्या कृत्याला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रमोद मुंजा याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.