संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाचा अन्वयार्थ

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक, मराठा समाजातील एक दिग्गज नेता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेंदुर्णीचे संजय गरुड यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संजय गरुड यांनी भाजपात प्रवेश करून काय साधले? जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. खुद्द भाजप कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात पडले असतील. परंतु सध्या प्रत्येक जण ‘पक्ष’ ऐवजी ‘स्वतःच्या स्वार्था’चा विचार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ‘संजय गरुड यांचा भाजप प्रवेश’ म्हणता येईल. धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी या शिक्षण संस्थेचे जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यात जाळे पसरले आहे. शेंदुर्णीला सीनियर महाविद्यालय, ज्युनिअर महाविद्यालय, वाकोदला ज्युनिअर महाविद्यालय, अनेक ठिकाणी वसतिगृहे, संस्थेचे रेशन धान्य दुकान आदी मिळून शेकडो कर्मचारी काम करत आहेत. नुकत्याच सादर सदर संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. त्यात त्यांचे दाजी म्हणजे कै. गजाननराव गरुड यांचे जावई सतीश चंद्र काशीद यांनी संजय गरुड यांच्या विरोधात पॅनल उभे करून निवडणूक लढवली. त्यात संजय गरुड यांचे पॅनल बहुमताने विजयी झाले, परंतु संपूर्ण शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा कारभार खुद्द दाजी काशीद हेच पाहायचे. निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी दाजी काशीद हे संजय गरुड विरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले. त्याचे कारण सुद्धा गिरीश महाजन असल्याचे बोलले जाते. दाजी काशीद यांना संजय गरुड विरुद्ध निवडणूक लढविण्यास गिरीश महाजन यांनीच सहकार्य करून दाजी आणि संजय गरुड यांचे मतभेद निर्माण करून दाजींना गरुड यांच्यापासून दूर केले. सुदैवाने संजय गरुड यांचे पॅनल बहुमताने निवडून आले आणि एक महत्त्वपूर्ण संस्था संजय गरुड यांच्याच ताब्यात राहिली. परंतु संस्था चालवताना ‘आपल्या संस्थेची जामनेर एज्युकेशन संस्थेसारखी अवस्था होईल’ या भीतीपोटी संजय गरुड यांनी कट्टर प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांचे बरोबर हात मिळवणी करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यात तथ्यांश नाही असे म्हणता येणार नाही. कारण जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रदीप लोढा, तोंडापूरचे डी. के. पाटील सहकार क्षेत्रातील दगडू विष्णू पाटील या मंडळींनी गरुड यांच्यासोबत प्रवेश केला नाही. त्यामुळे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला नसल्याने त्यांच्या प्रवेशाला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे म्हणता येणार नाही.

 

अनेक वर्ष काँग्रेसमध्ये असलेले गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा परिवारासह भाजप प्रवेश सुद्धा अनेकांना रुचला नाही. रावेर लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी प्रवेश केला असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. ‘काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही आहे’ असा आरोप करणाऱ्या डॉ. उल्हास पाटलांना गेली ४०-४५ वर्षात एकाधिकारशाही असल्याचा प्रत्यय आला नाही. तो आताच का आला? असा प्रश्न जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी यांनी उपस्थित केला, तो योग्यच म्हणता येईल. संजय गरुड हे गेली अनेक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गिरीश महाजन यांच्या विरुद्ध आमदारकीची निवडणूक लढवून चुकले आहेत. त्यांनी चांगली टक्कर देखील दिली आहे. स्वतः तसेच त्यांच्या पत्नीने जिल्हा परिषद सदस्य पद उपभोगले आहे. पक्ष संघटन बांधून जिल्ह्यात राजकारणाचा वापर समाजकारणासाठी अधिक प्रभावी केला असता तर गिरीश महाजन यांच्या विरोधात ते निवडून येऊ शकले असते. परंतु आता सर्वांनाच शॉर्टकट हवा असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये जाऊन संस्थेच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा जम बसविण्याचा गरुड यांचा प्रयत्न कितपत सफल होईल, हे आगामी काळच ठरवेल. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जामनेर तालुक्यातील भाजपचे अनेक कार्यकर्ते मानतात. त्यामुळे राष्ट्रवादी तर्फे नवीन उमेदवार देऊन एकनाथ खडसे गिरीश महाजन यांना टक्कर देतील यात शंका नाही. ‘संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाने त्यांचे राजकीय अस्तित्व यापुढे संपुष्टात आले आहे’, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण भाजपातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना गरुड यांचा प्रवेश कितपत रुचलाय हे सांगता येत नाही. कै. गजानन गरुड यांचे पुतणे म्हणून त्यांची ओळख.. परंतु कै. गजानन गरुडांचा करारी बाणा संजय गरुड यांच्यात आलेला नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. खुद्द आपल्या घरातील कै. गजानन गरुड यांचे जावई दाजी काशिद यांना सुद्धा संजय गरुड यांना सांभाळता आले नाही. स्वतंत्र बाणा निर्माण करण्यात संजय गरुड अपयशी ठरले. म्हणून त्यांच्या भाजप प्रवेशाने विशेष असे काही साध्य होईल असे वाटत नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.