अकलूद येथे बंद घर फोडले ; ११ लाखांचा ऐवज लंपास

0

जळगाव : – सेमीनार साठी मुंबई येथे गेलेल्या प्रॉपर्टी डिलरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना दि. २९ जानेवारी रोजी यावल तालुक्यातील अकलूद येथे घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी पाच लाखांची रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील अकलूद येथील समर्थ नगरात राजेश गुनघरजी नखाते (जैन) हे वास्तव्यास असून त्यांचा प्रॉपटी ब्रोकरचा व्यवासाय आहे. दि. २७ जानेवारी रोजी ते मुंबई येथे सेमीनारसाठी गेले होते. तर त्यांची पत्नी अकोला येथे निघून गेल्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी कपटात ठेवलेली पाच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरुन नेले. दि. २९ जानेवारी रोजी नखाते हेघरी परतल्यानंतर त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली.

चोरट्यांनी नखाते यांच्या घरातून चार तोळे सोन्याची पोत, एक तोळे सोन्याचा गोफ, एक तोळ्याची अंगठी, १५ ग्रॅम सोन्याच्या अंगठया, सहा ग्रॅम वजनाची अंगठी, २५ ग्रॅमवजनाचे पाच कानातील जोड, १०० ग्रॅम मण्यांची पोत, १३ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीची लक्ष्मीची मुर्ती, १२ जोड चांदीचे तोरड्या, पाच लाख रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्या.घरातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकलेला होता. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच नखाते यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली. परंतु त्यांना काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनंतर त्यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.