वाळू माफियांकडे पैसा आहे तरी किती..?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल विभागातील टीमने गेल्या सहा महिन्यांपासून जेरीस आणले आहे. गिरणा आणि तापी नदी पात्रातील वाळूची अवैध तस्करी करणारी वाळू माफियांची वाहने जप्त करण्यात येत आहेत. भरलेले ट्रक, ट्रॉली आणि ट्रॅक्टर ही जप्त केलेली वाहने जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयासमोरील मैदानात ठेवण्यात आल्याने मैदान पूर्णपणे व्यापून गेले आहे. त्या सर्व जप्त वाहनांचा दंड न भरला गेल्याने येत्या २२ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात जाहीर लिलाव करून त्याची विक्री करण्यात येणार आहे. तरीसुद्धा वाळू माफियांकडून वाळूची तस्करी थांबत नाही. पंधरा दिवसांपूर्वीच निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर तरसोद जवळ प्राणघातक हल्ला झाला होता. त्या हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर पोलीस कारवाई सुरू असतानाच परवा जळगावचे तहसील शितल राजपूत यांचे पथकाकडून निमखेडी आव्हाने शिवारात वाळूने भरलेला ट्रक पकडला आणि जप्त केला. ही माहिती वाळू माफियांना मिळताच वाळू तस्करी बाबत इतरांना सूचना देऊन स्वागत करण्यात आले. एवढेच नव्हे तर पंधरा-वीस तरुणांच्या टोळक्याकडून दुचाकीवरून तहसीलदार शितल राजपूत यांच्या गाडीचा पाठलाग केला गेला. ही बाब तहसीलदार शितल राजपूत यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्या वाहनातून मोबाईलच्या सहाय्याने पाठलाग करणाऱ्या दुचाकीस्वार गुंडांचे व्हिडिओ कॅमेरात कैद केले. तहसीलदार शितल राजपूत यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती आणि व्हिडिओ पाठवल्याने पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. पोलिसांची कारवाई सुरू होते आहे, असे या दुचाकी वरील गुंडांना लक्षात येतात ते पसार झाले आहेत. परंतु व्हिडिओमध्ये त्यांचे फोटो कैद झाल्यामुळे त्यांच्यावर पोलीस कारवाई करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील वाळू तस्करांची संख्या मोठी आहे. तसेच त्यांच्याकडे गुंडांना पोसण्यासाठी सा देखील मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध असल्याशिवाय महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वारंवार ते हल्ले करू शकतात. दोन महिन्यापूर्वी चोपडा येथील प्रांताधिकार्‍यांवर हल्ला झाला. त्यानंतर एरंडोल येथील प्रांताधिकार्‍यांवर हल्ला झाला. पंधरा दिवसांपूर्वी जळगावचे निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला न मिळाला तोच परवा तहसीलदार शितल राजपूत यांचा वाळू माफियां च्या गुंडांच्या टोळक्याकडून दुचाकी वरून पाठलाग केला गेला. म्हणजे वाळू माफियांची हिम्मत अद्याप खचलेली नाही. याचे कारण त्यांच्याजवळ असलेला वाळू तस्करीचा वारेमाप पैसा हे होय. वाळू माफिया आणि जळगाव जिल्ह्यातील महसूल यंत्रणा यांच्यात जण युद्धच सुरू आहे. परंतु वाळूमाफियांना ठेचून काढण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांची महसूल यंत्रणा सजग असून त्यांनी वाळूमाफियांना न घाबरता जीव धोक्यात घालून त्यांना जेरीस आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

 

जलगाव जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा आणि तापी नदीवरील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल यंत्रणेकडून जी कारवाई होते आहे, तसेच जळगाव जिल्हा पोलिसांचे त्यांना मिळणारे सहकार्य याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहेत. परंतु एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, नदीतील वाळू ही शासनाची संपत्ती असून तिचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे महसूल संघटनेच्या वतीने जाहीर केले जात असताना आरटीओ या शासनाच्या एका विभागाकडून मिळावे तसे सहकार्य मिळत नसल्याबद्दल खेद वाटतो. आरटीओ विभागाला अवैध वाळूचे तस्करी करणाऱ्यांकडून हप्ते मिळतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांवर आरटीओ कडून कारवाई होत नाही, असा आरोप महसूल संघटनेकडून नुकताच करण्यात आला आहे. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना संघटनेकडून देण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर वाळू माफियांकडून जीव घेणे हल्ले होत असताना आरटीओ विभाग मात्र त्या वाळूमाफियांकडून हप्ते घेऊन त्यांना सहकार्य करीत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल. जळगाव जिल्ह्यातील आरटीओ विभागावर शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जातीने लक्ष घालून त्या विभागातील अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. म्हणजे महसूल संघटनेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मनोबल वाढेल अन्यथा त्यांचा वाळूतस्करी रोखणे संदर्भातील आणि वाळू माफियांच्या माज जिरवण्याकरता जे काम करत आहेत, त्यांचे खच्चीकरण होईल. तरीसुद्धा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या महसूल यंत्रणा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत असलेल्या कारवाईबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन…!

Leave A Reply

Your email address will not be published.