सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध पक्षांमध्ये चर्चा सुरू झाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी तर्फे विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी जागा वाटपाबाबत बोलणे सुरू आहे. जळगाव येथे नुकतीच शरद पवार यांची जाहीर सभा झाली. त्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आता जळगाव जिल्ह्यात लोकसभेचे शिव धनुष्य हाती घ्यावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील जळगाव अथवा रावेर लोकसभा असा काही त्यांनी उल्लेख केला नव्हता. त्यासाठी गेल्या २०-२५ वर्षापासून भाजपात असताना जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपतर्फे निवडून आणण्यासाठी एकनाथ खडसे यांनी पुढाकार घेतला असला, तरी आता समजा लोकसभेची निवडणूक लढवायचीच म्हटली तर नाथाभाऊ रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणे पसंत करतील. नाथाभाऊंनी जाहीर केले की, पक्षाने जर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या आदेश दिले तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे. परंतु जागा वाटपामध्ये रावेर लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाने धावा केलाय. असे असले तरी गेल्या दहा लोकसभा निवडणुकीमध्ये मध्यंतर १९९६ सालातील १३ महिन्यांचा अपवाद वगळता रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार नाथाभाऊ यांच्या सून रक्षाताई खडसे यांनी सुद्धा षड्डू ठोकला आहे. भाजपने जर मला रावेरमधून निवडणूक लढवण्याची संधी दिली, तर आपण भाजप तर्फे निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. रावेर लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांना भाजपतर्फे उमेदवारी घोषित झाली असताना ऐनवेळी कै. हरिभाऊ जावळे यांना मिळालेले लोकसभेचे तिकीट रद्द करून नवख्या जिल्हा परिषदेच्या सभापती असलेल्या रक्षा खडसेंना रावेर लोकसभेची उमेदवारी नाथाभाऊंच्या आग्रहास्तव मिळाली होती. त्यावेळी कैलासवासी हरिभाऊंचे तिकीट कापून सुनेला तिकीट दिल्याबद्दल भाजपमधील एक गट विशेषतः गिरीश महाजन आदींनी नाराजी व्यक्त केली होती. तथापि रक्षा खडसेंना २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळाला होता. रक्षा खडसेंच्या विजयात एकनाथ खडसे यांच्या सिंहाचा वाटा होता हे मान्य करावे लागेल. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या सीटिंग खासदार म्हणून रक्षा खडसेंना पुन्हा भाजप तर्फे उमेदवारी मिळाली. २०१९ च्या निवडणुकीतही त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांच्या या विजयात त्यांचे सासरे यांची पुण्याई कामी आली, हे कोणालाही नाकारता येणार नाही. राजकारणाचे धडे रक्षा खडसेंना त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांच्याकडून मिळाले आहेत, हे मान्य करावेच लागेल. तथापि आता परिस्थिती बदलली आहे. नाथाभाऊंनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. नाते जरी सासरे सुनेचे असले तरी आमचे पक्षीय मार्ग वेगळे आहेत, त्यामुळे मला भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचे आदेश दिले तर आपल्याला सासऱ्यान विरोधात नाईलाजास्त लढावे लागणार आहे. इथे प्रश्न व्यक्तीचा नाही पक्षाचा असून पंतप्रधान मोदींच्या कार्यातील विश्वासाचा आहे, अशी भाषा रक्षा खडसेंनी करून जणू सासऱ्यांविरुद्ध लढण्याची तयारी दर्शवली आहे.

 

राजकारणाची आणि राजकीय सत्तेची नशा काही औरच असते. एकदा राजकीय सत्तेची लालसा निर्माण झाली की नातेसंबंधाला थारा दिला जात नाही. एका घराण्यातले राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असलेली अनेक उदाहरणे देता येतील. त्यातीलच रक्षा खडसे आणि नाथाभाऊ यांच्यातील नातेसंबंध हे एक होय. रक्षा खडसेंनी म्हटले आहे की, नाथाभाऊ माझे सासरे असले तरी ते माझ्या वडिलांसमान आहेत. तरीसुद्धा पक्षाने आदेश दिला तर वडिलांविरोधात रणांगणात उतरून लढाई करण्याची त्यांची तयारी आहे. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही, आज सासरा आणि सुनेत पक्षातर्फे भांडण लावले जातेय. सासऱ्याविरुद्ध सुनेची भूमिका कशाप्रकारे राहील याची चाचपणी पक्ष करीत नसेल कशावरून? लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाथाभाऊंच्या विरोधात रक्षा खडसे दोन लाख मताधिक्यांनी विजयी होतील, असे जाहीर वक्तव्य केले. २०१९ च्या निवडणुकीत पाच वर्षे कॅबिनेट मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने आमदारकीचे तिकीट दिले नव्हते. तेव्हा भाजप पक्षातर्फे कोणती भूमिका ऐनवेळी घेतली जाईल, हे सांगित सांगणे कठीण आहे. कारण हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष असल्याने तज्ञ विश्लेषकांकडून जसे रिपोर्ट येतील त्यानुसार पक्ष निर्णय घेई.ल तथापि आजमितीला राष्ट्रवादीतर्फे एकनाथराव खडसे आणि त्यांची सून भाजपच्या रक्षा खडसे यांच्यातील वाक्य युद्धाला उधाण आले आहे. सासरे सून हे भावनिक नाते असल्यामुळे दोघांमधील निवडणूक लढण्याच्या वक्तव्याकडे वेगवेगळ्या अर्थाने पाहिले जातेय. वर्षभरानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी नेमके काय घडते हा भाग अलाहिला असला तरी सासरा आणि सुनेत लोकसभा निवडणुकीची चर्चा मात्र रंगत आहे, एवढे निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.