नाडगाव उड्डाणपूल बांधकामात भ्रष्टाचार

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

मुक्ताईनगर बोदवड महामार्गावर नाडगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते. परंतु रीतसर उद्घाटन सोहळा करून त्याचे लोकार्पण होणे बाकी होते. त्यामुळे सदर उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण झाले, म्हणून मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सदर पूल वाहतुकीसाठी सुरू करावा खुला करावा आणि वाहतूकदारांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली. तथापि आ. चंद्रकांत पाटील यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. केवळ उद्घाटन सोहळ्यासाठी पुलावरून वाहतूक थांबविणे, ही बाब आ. चंद्रकांत पाटलांना योग्य वाटली नाही. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. पूल बांधून तयार होऊन तीन महिने झाले असताना त्यावरून वाहतूक सुरु होत नाही. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी जनतेच्या आग्रहास्तव आ. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह समर्थक कार्यकर्त्यांसह पंधरा दिवसांपूर्वी पुलावर लावण्यात आलेले बॅरिगेट्स जेसीबी द्वारे हटवून जनतेसाठी हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. त्यावेळी आ. चंद्रकांत पाटलांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली. खा रक्षा खडसे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करून त्याचा लोकार्पण सोहळा होण्याआधीच आ. चंद्रकांत पाटलांनी या पुलाचे बेकायदा वाहतूक सुरू केली, अशी ही टीका झाली. तथापि आ. चंद्रकांत पाटील यांनी जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पुलावरून वाहतूक सुरू केली. यात कुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून या पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. परंतु पुलाचे काम अत्यंत निकृष्टपणाचे झाले असल्याचा आरोप माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. अवघा अवघ्या पंधरा दिवसातच या पुलावर खड्डे पडले असल्याने पुलाच्या बांधकामा मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आ. खडसे यांनी केला. अधिकाऱ्यांनी टक्केवारी मिळवण्यासाठी मोठा भ्रष्टाचार केला. त्याकरिता ठेकेदाराचे बिल मंजूर करू नये, अशी मागणी ही खडसे यांनी केली आहे.

पूल  बांधून तीन महिने झाले असताना केवळ उद्घाटन करण्याच्या प्रतीक्षेत पूल वाहतुकीस खुला केला जात नाही म्हणून आमदारांनी आपल्या अखत्यारीत जनतेच्या साक्षीने जनतेच्या हितासाठी विनापरवानगी वाहतुकीस खुला केला. हा वादाचा विषय चर्चेचा असतानाच अवघ्या पंधरा दिवसात सदर पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केल्याने आता दुसऱ्या वादाला तोंड फुटले आहे. आ. एकनाथ खडसे हे या पुलाच्या निकृष्टतेवर आरोप करून ते थांबले नाहीत तर संपूर्ण मतदारसंघातील रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. हा आरोप करताना त्यांचा रोख स्थानिक आ. चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता त्यांच्याकडे होता. त्यातून आ. चंद्रकांत पाटील आणि आ. खडसे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते असल्याचे स्पष्ट दिसते. अधिकाऱ्यांनी टक्केवारी मिळवण्यासाठी ठेकेदारांच्या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष केले असल्याचा स्पष्ट आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे नाडगाव पुलाच्या उद्घाटना आधीच वाहतुकीसाठी खुला करणे, यातून  ढिम्म प्रशासनाला आ. चंद्रकांत पाटलांनी चपरा दिली त्याबद्दल आम्ही आ. चंद्रकांत पाटलांच्या या कृतीचे स्वागत केले होते. परंतु आता पुलाच्या बांधकामावरील भ्रष्ट बांधकामातील भ्रष्टाचार त्याला जबाबदार असणाऱ्याला चव्हाट्यावर आणण्याची जबाबदारी दोन्ही आमदारांची आहे. आ. चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांचे राजकीय भांडण असले तरी या पुलाच्या बांधकामातील भ्रष्टाचार शोधून काढण्यासाठी दोघांनी एकत्र आले पाहिजे, असे आमचे मत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.