युवकांना सुवर्णसंधी: आरोग्य विभागात 12 हजार पदांची मेगाभरती

मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

0

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवार, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या वतीने लवकरच बारा हजार पदांची भरती केली जाणार आहे. विशेषत: गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 12 हजार पदांसाठीची जाहिरात आज म्हणजे मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली.

राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. परंतू साधारण महिन्याभरापूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये विशेष लक्ष घातलं आहे. कर्मचाऱ्यांची वाणवा मिटविण्यासाठी सरकारच्या वतीने आरोग्य विभागात 12 हजार पदांची भरती केली जाणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी म्हणजेच आज प्रसिद्ध होणार आहे.

आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आरोग्य विभागात आता बंपर भरती होणार आहे. तब्बल 12 हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

आरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची देखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी देखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.