लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्ह्यात गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधील अवैध वाळू उपसा रोखण्याचा शासकीय यंत्रणेमार्फत कसोशीने प्रयत्न केला जात असला तरी दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोपडा येथील प्रांताधिकार्यांच्या गाडीला अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने धडक देऊन कारचे नुकसान केले. त्यात प्रांताधिकारी जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. इतकेच नव्हे तर अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडविणाऱ्या तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी सदर ट्रॅक्टर चालकाने दिली. प्रांताधिकारी एकनाथ बंगळे आणि तलाठी गुलाबसिंग पावरा हे जळगाव येथील मीटिंग आटोपून खेडी भोकरी मार्गे चोपड्याला कारने जात होते. खेडगाव जवळ सदर घटना घडली. प्रांताधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला हे वाळूमाफीये ‘किस झाड की पत्ती’ अशा अर्थाने पाहतात. अधिकाऱ्यांची भीती या वाळूमाफियांना वाटत नाही, त्याचे कारण काय? वाळू माफियांना जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा याबाबत खडा न खडा माहिती असते. ‘चोर ते चोर, आणखी वरून शिरजोर’ होण्याच्या कारणांचा शोध घेतला तर त्यांची हिंमत वाढण्यामागे राजकीय अभय हेच एकमेव कारण आहे, असे दिसून येईल. अनेक वेळा महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अवैध धंद्याच्या संदर्भात प्रामाणिक कारवाई केली जा.ते परंतु सत्ताधारी राजकीय लोकप्रतिनिधींचा फोन या अधिकाऱ्यांना येतो आणि त्यामुळे प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मीटर डाउन होते. त्यामुळे अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचते. जीवावर उदार होऊन आपण कारवाई करायची आणि त्याला राजकारणी मंडळी पाठीशी घालत असल्याने कारवाई करण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ‘आमचे कोणी वाकडे करू शकत नाही’ अशी भावना निर्माण होऊन अवैध धंदे करण्याची हिम्मत दिवसेंदिवस वाढत जाते. हल्ली तेच होताना दिसून येत आहे. त्यालाच हा चोपडा प्रांताधिकार्यांच्या संदर्भात घडलेला प्रकार म्हणता येईल. अवैध मार्गाने कमी श्रमात वारेमात कमाई होते. त्यामुळे अवैध धंदे करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. प्रांताधिकारी बंगळे यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक राजस विलास मालवे आणि ट्रॅक्टर मालक सुरेंद्र कोळी यांच्याविरुद्ध चोपडा पोलिसात प्रांताधिकारी यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत. तथापि या फिर्यादीनंतर पोलीस तपासात काहीही निष्पन्न होणार नाही. कारण काय? आल्या पळवाटा शोधून त्यातून सही सलामत सुटका करून घेण्यात हे वाळूमाफिये वस्ताद झाले आहेत. प्रत्यक्षदर्शी प्रांताधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेल्या फिर्यादीनंतर ज्या पद्धतीची कारवाई होते हा प्रकार म्हणजे या माफियांची पळवाट आहे. अथवा घटनांच्या संदर्भात कडक कायद्याचा अंमल झाला तरच अवैध धंदेवाल्यांना जबर बसेल. अन्यथा माफियांची मुजोरी रोखण्यात शासकीय यंत्रणेला अपयश येत राहील…
मध्यंतरी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जळगावचे खासदार उमेश पाटील यांचे अवैध वाळू उपसा संदर्भात आरोप प्रत्यारोप चांगलेच रंगले होते. खासदार उमेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील पाळधीहून दररोज जळगावला गिरणा नदीच्या पुलावरून ये-जा करतात. त्यांना गिरणापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर दिसत नाही का? असा आरोप केला होता. त्याला प्रतिकार म्हणून खासदार उमेश पाटलांवर पालकमंत्र्यांनी तोफ डागली होती. खासदार उमेश पाटलांवरही आरोप केले होते. त्यानंतर ‘तेरी भी चूप और मेरी भी चुप’ या उक्तीप्रमाणे दोन्ही नेते गप्प बसले. याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा तो घेतला. त्यानंतर खासदार उमेश पाटलांनी गिरणा बचावसाठी गिरणा परिक्रमा केली. या परिक्रमेचे फलित काय झाले? हे अद्याप जनतेला कळलेले नाही. ‘सर्वपक्षीय परिक्रमा’ असे या मोहिमेस गोंडस नाव दिले गेले. परंतु नंतर ती फक्त भाजपचीच आणि विशेषतः खासदार उमेश पाटील यांची एकट्याची परिक्रमा झाली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे अवैध धंदे वाल्यांना वाळू माफियांना राजकीय आशीर्वाद असल्याने वाळूमाफे यांची मुजोरी वाढते हे सत्य नाकारता येणार नाही. ड्रग माफिया ललित पाटील वर्षानुवर्षे ससून हॉस्पिटलमध्ये आजारावर उपचार घेत असल्याचे दाखवून ससून हॉस्पिटल मधून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्स खुलेआम करणे विक्री करत काम करत होता. ससून मध्ये सरकारच्या पगार घेऊन काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांचे कडून ललित पाटीलला त्याच्या ड्रग्स व्यवसायात मदत करण्याचे कारण काय? वरपासून खालपर्यंतची यंत्रणा पोखरली गेल्याने ललित पाटीलकडून त्याचा फायदा घेतला गेला. म्हणून या ड्रग्ज माफियांची हिम्मत वाढली आहे, हे सत्य आहे. तसाच प्रकार वाळू माफियांच्या संदर्भात आहे. जळगावात नुकतेच टेंडर माफियांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात सशस्त्र धुमाकूळ घातला, परंतु त्याची कुठेही नोंद नाही. या मागचे कारण काय? यातच सर्व काही आले…!