दिलासादायक – १४३ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना मिळणार ३ कोटी ७४ लाखांचा उर्वरित भूसंपादन मोबदला

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन झालेल्या १४३ शेतकऱ्यांना २०१८ मध्ये पन्नास टक्के मोबदला रक्कम मिळाली होती. त्यानंतर पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ३ कोटी ७४ लाख ९२ हजारांची उर्वरित मोबदला रक्कम मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद गगनात मावत नव्हता. शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत आभार मानले आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भडगाव (जुवार्डी, आडळसे, पथराड,गुढे), एरंडोल (गालापूर) व पारोळा (पळासखेडे सिम, नगांव, मंगरूळ, मोरफळ) तालुक्यातील ६ नदीजोड योजनांसाठी १४३ शेतकऱ्यांच्या २००८ पासून लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जमीन संपादन करण्यात आल्या होत्या. निधी ‍वितरित न झाल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळणे प्रलंबित होते. याबाबत याभागातील शेतकऱ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विषयावर लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे व जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांना विषय समजून घेतला. २९ मार्च २०२३ रोजी याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरणात काही अडचण नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी तात्काळ निधी वितरण आदेश दिले. त्यानुसार शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावर दिवाळी आधी मोबदला रक्कम मिळणार आहे.

‘‘पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी केलेला पाठपुरावा व जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका यामुळे आम्हाला अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर उर्वरित मोबदला रक्कम मिळाली आहे. आमच्या आनंदाला पारावरा उरला नाही.’’ अशी प्रतिक्रिया गुढे गावातील उत्तम बाबुलाल पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार किशोर पाटील यांनी केलेला सात्ययपूर्ण पाठपुरावा. पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांमुळे तब्बल पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर आम्हा शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर टक्के मोबदला रक्कम दिवाळी आधी मिळणार आहे. यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही अशी प्रतिक्रियी जुवार्डी येथील शेतकरी रमेश पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.