नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांची शुक्रवारी महिलादिनाचे औचित्य साधत राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड करण्यात आली. राज्यसभा सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मूर्तीचे अभिनंदन केले. महिलादिनी राज्यसभेवर निवड होणे ही माझ्यासाठी दुप्पट आश्चर्याची बाब असल्याची प्रतिक्रिया देत सुधा मूर्ती यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
मोदींनी एक्स सोशल मीडियावरून मूर्ती यांच्या राज्यसभा निवडीची माहिती देताना त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यसभेसारख्या उच्च सभागृहात मूर्तीची निवड होणे हे नारीशक्तीचा एक सबळ पुरावा असून, तो राष्ट्राच्या नियतीला आकार देण्यासाठी महिलांची शक्ती व क्षमतेच एक उदाहरण आहे. सामाजिक कार्य, परोपकार
व शिक्षण क्षेत्रात मूर्तीचे योगदान अमर्याद व प्रेरणादायी असल्याचे ट्विट मोदींनी केले. इन्फोसिसच्या सहसंस्थापक व एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा या ‘मूर्ती स्ट्रस्ट’च्या अध्यक्षा असून, त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मूर्ती या ७३ वर्षांच्या आहेत.
सुधा मूर्तीचा २००६ साली पद्मश्री व २०२३ साली पद्म भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. महिला दिनानिमित्त राज्यसभेवर निवड होणे ही माझ्यासाठी दुप्पट आश्चर्याची बाब असल्याची प्रतिक्रिया सुधा मूर्ती यांनी दिली. मी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही. राज्यसभेवर निवड होणार, यासंदर्भात कुठलीही पूर्वकल्पना मला नव्हती. राज्यसभेवर निवड होणे हा माझ्यासाठी सुखद आश्चर्याचा धक्का असल्याचे त्या म्हणाल्या.