नियोजित कार्यक्रमालाच मंत्री देशमुखांची दांडी

0

माजी मंत्री जामनेरचे गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त काल जामनेरमध्ये आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्या दौऱ्यामुळे जामनेरला यात्रेचे स्वरूप आले होते. गिरीश महाजनांची कन्या श्रेया आणि जावई अक्षय या नवदाम्पत्यांना शुभेच्छांचा जणू वर्षाव झाला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवेंसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांचेसह राज्याचे अनेक मंत्र्यांची उपस्थिती लक्ष्यवेधी ठरली. जामनेरला आलेल्या मंत्र्यांची प्रतिक्रियांसाठी पत्रकार पुढे सरसावले तर मंत्री दानवे, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, राजकीय प्रतिक्रिया देण्यास पुढे सरसावले तर नितीन गडकरींसह अनेकांनी लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अगदी गिरीश महाजनांशी विळ्या भोपळ्याचे नाते असलेल्या एकनाथराव खडसेंनी राजकीय प्रतिक्रिया देणे टाळले. जिल्हा बँकेच्या माजी चेअमरन ॲड. रोहिणी खडसेंनी सुध्दा वधू-वरांना शुभेच्छांचा संदेश दिला पण राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सर्वात कौतुकास्पद आणि आदर्श केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घातला. ते नागपूरहून दुपारी 3.30 वाजता विमानाने आले. मोटारीने जामनेरला गेले. तेथे गिरीश महाजन तसेच नवदाम्पत्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि परत विमानतळावरून नागपूरला रवाना झाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रतिक्रियांना त्यांनी स्पष्ट नकार दिला. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य एवढ्यासाठीच की राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री काँग्रेसचे अमित देशमुख हे सुध्दा जामनेरला गिरीश महाजनांच्या लग्नकार्यासाठी खास दौरा करून आले होते. या खाजगी कार्यक्रमाचे निमित्त साधून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चिंचोली येथील नियोजित मेडिकल हब जागेची पहाणी करून अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीचा कार्यक्रम ठरला होता. त्याकरिता चिंचोली येथील जागेवर मंडपही उभारण्यात आला होता. त्या ठिकाणी सुमारे 12.30 ते 12.45 ही बैठकीची वेळ ठरलेली होती. त्यानुसार सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी निगडित अधिकारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तसेच या मेडिकल हबच्या इमारती बांधकामाचे दिल्लीचे कंत्राटदार हे उपस्थित होते.

दुपारी 12.30 पासून दिवसभर ही यंत्रणा तेथे वाट पहात होती. शेवटी संदेश आला मंत्री महोदयांना येणे शक्य नाही. तेव्हा पाट पाहून अधिकारी वर्ग तेथून परतले. एवढा मोठा खर्च केला गेला. मंडप उभारला गेला तथापि मंत्री अमित देशमुख हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची पहाणी तर केलीच नाही. बैठकही रद्द केली.

वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या दौऱ्यातील नियोजित कार्यक्रम जाहीर झाला असतांना त्यांना वेळ मिळू नये हे जळगावकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. मंत्री अमित देशमुख हे काँग्रेस पक्षाचे असल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी त्यांनी वेळ दिला. ते काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या महाविद्यालयाला भेट देऊ शकले. माजी खासदार कॉंग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊ शकले. काँग्रेस पक्षासाठी त्यांनी वेळ दिला. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पहाणी करून आढावा बैठक घेण्याच्या कार्यक्रमाकडे मात्र पाठ फिरविली.

अमित देशमुखांनी आपला काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत. परंतु ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्या खात्याच्या वतीने नियोजित केलेला दौरा करू नये हे क्षम्य नाही. दिवसभर शासकीय अधिकारी तेथे थांबून होते. मंडप उभारून बैठकीसाठी यंत्रणा सज्ज केलेली असतांना साधे तिकडे ढुंकूनही पाहू नये ही बाब जळगाव करांसाठी खटकणारी आहे. एकतर 1917 पासून सुरू झालेले जळगावचे शासकीय महाविद्यालय जिल्हा रूग्णालय कसेबसे चालू आहे. विद्यार्थ्यांसाठी होस्टेल खाजगी जागा भाड्याने घेतलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल हबसाठी शासकीय जमीन उपलब्ध घेऊन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला.

तथापि त्या ठिकाणी अद्याप बांधकामाची एक विट बांधलेली नाही. अशा कामाला गती देण्याचे काम करण्याऐवजी तुम्ही खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देता हे अशोभनीय आहे. 2024 मध्ये आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर आपल्या खात्यातर्फे गतीमान कामे झाली पाहिजेत. तथापि जळगाव शासकीय महाविद्यालयाच्या मेडिकल हबचे काम अद्यापपावेतो कागदावरच आहे. म्हणून अमित देशमुखांकडून ही अपेक्षा नव्हती. या नियोजित दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करण्याचे कारण काय? त्यासाठी झालेल्या शासकीय यंत्रणेच्या वापराचा खर्चाचा भुर्दंड कुणावर बसणार? या सर्व बाबींचा खुलासा झाला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.