तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

0

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रक्षाबंधन उत्सवाची सुप्रभात उगवताच लोहारा तालुका पाचोरा येथील शेळके कुटुंबावर तरुण मुलगा सर्पदंशाने मयत झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकरी सुधीर वेडू शेळके यांचा गावालगत गोठा असून बैल जोडी सोबत इतर गुरही आहेत. या गुरांना यांचा मोठा मुलगा निलेश सुधीर शेळके (वय २५) हा आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास गुरांना चारा टाकण्यासाठी गेला होता. कडब्याची पेंढी उचलत असताना त्यास विषारी सर्पाने चावा घेतला. सुरुवातीला ही बाब त्याच्या लक्षात आली नाही. थोड्याच वेळात त्याला वेदना होत असल्याने तो घरी चालत आला व काहीतरी माझ्या हाताला चावला, मला मळमळ व गरगरल्यासारखे होत आहे असे त्याने कुटुंबीयास सांगितले. कुटुंबीयांनी गांभीर्याने त्यास लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात खाजगी वाहनाने घेऊन गेले.

मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असावी. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करून अतिशय शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांचा व नातलगांचा आक्रोश हा मन हेलावणारा होता. मयत हा उच्चशिक्षित डी फार्मसी झालेला असून गोवा येथील औषध निर्माता कंपनीमध्ये कामाला होता.  नोकरी करून पैसे कमवेल व चांगले घर बांधेल असे त्याचे स्वप्न असल्याचे रडताना मनास वाट मोकळी करताना त्याच्या वडिलांच्या टाहोमधून शब्द बाहेर पडत होते.

पण हे स्वप्न कुटुंबियातील कर्ता तरुण मुलगा गेल्याने धुळीस मिळाले. अवघ्या दोन महिन्यांपासून सुट्टीनिमित्त तो गावी आलेला होता. वडिलांना कामात मदत व्हावी, म्हणून तो शेतीकाम व दैनंदिन गुरांना चारापाणी करण्याचे काम करीत होता.  मृत तरुणांच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.  रक्षाबंधन उत्सवाच्या दिवशी हा दुःखाचा दिवस शेळके कुटुंबीयांवर आल्याने परिवार व नातलग यांच्या कायम स्मरणात राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.