शिवाजीनगर उड्डाणपूल डिझाइननुसारच…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिवाजीनगर उड्डाणपूल कशा पद्धतीचा हवा यावरून सुरू असलेला वाद संपणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीनुसार डिझाइननुसारच पुलाचे काम करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. टी आकाराच्या पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने अडथळे दूर करण्याची सूचना केली. त्यासाठी पीडब्लूडीकडून लवकरच सीमांकन करून दिले जाणार आहे. दरम्यान, इच्छादेवी रस्त्यासाठी ‘न्हाई’ तसेच पीडब्लूडीनेही प्रस्ताव पाठवला आहे. ज्याचा प्रस्ताव लवकर मंजूर होईल त्यांनी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम हे नियोजित डिझाइननुसारच केले जाणार आहे.

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेज दरम्यानच्या रस्त्याच्या कामाची मागणी होत आहे. प्रचंड वर्दळीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याचसंदर्भात नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इच्छादेवी रस्त्याचे दायित्व घेण्यास मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नकार दिल्याबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी तक्रार केली होती. या रस्त्याचे दायित्व नेमके कुणाकडे आहे, अशी विचारणा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना केली होती.

त्या अनुषंगाने बैठक घेऊन दायित्व निश्चित करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार बुधवारी जिल्हाधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या वेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, धुळे विभागाचे श्रीकांत महाले, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, पीडब्लूडीचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होते.

इच्छादेवी रस्त्याच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यात आला आहे. मनपाने तातडीने न्हाईकडे एनओसी द्यावी. गरज भासल्यास ताबा पावती करून द्यावी असे आदेश देण्यात आले. चार किमी रस्त्यासाठी न्हाई कडून मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. पीडब्लूडीने देखील राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला. त्यामुळे ज्यांचा प्रस्ताव लवकर मंजूर होईल त्यांनी रस्त्याचे काम करावे असा निर्णय घेण्यात आला. पीडब्लूडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास न्हाई ने नाहरकत द्यावी असेही ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.