शनया वसिष्ठच्या ‘रत्नचित्रावली’ला ऑस्कर विजेत्यांच्या चित्रांची झळाळी

0

गाडगीळ कला दालनात प्रदर्शनाचा शुभारंभ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील 15 वर्षांची, दहावीतील विद्यार्थिनी शनया वसिष्ठ हिने गुरु तरुण भाटे यांच्या मार्गदर्शनात भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी असलेल्या निवडक व्यक्तींच्या काढलेल्या चित्रांचे रत्नचित्रावली या प्रदर्शनाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

रिंगरोडवरील पी एन गाडगीळ ज्वेलर्स कलादालनात आयोजित प्रदर्शनाच्या शुभारंभ सोहळ्यास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन ,रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचे विराफ पेसुना, याझवीन पेसुना, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, पी एन गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापक संदीप पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी उद्योगपती अशोक जैन यांनी शनयाने काढलेले सर्व भारतरत्नांचे 25 चित्र व दोन ऑस्कर पुरस्कार प्राप्त चित्र विकत घेऊन अनुभूती शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून लावणार असल्याचे यावेळी घोषित करून तिच्या कलेचे कौतुक केले. डॉ.केतकी पाटील यांनी शनयाला इतक्या कमी वयात असलेली कलेची जाण आणि सामाजिक भान याचे श्रेय तिच्या पालकांचे संस्कार आणि गुरु तरुण भाटे यांचे मार्गदर्शन याला आहे असे प्रतिपादन केले. कलाशालाचे संचालक तरुण भाटे यांनी शनया या माझ्या विद्यार्थिनीच्या छोट्या हातांनी खूप मोठे काम केले आहे असे सांगत शाबासकीची थाप दिली. विराफ पेसुना यांनी पालकांनी मुलांच्या कलेच्या आवडीकडे छंद म्हणून न पाहता करिअर म्हणून पहावे असे आवाहन करून रुस्तमजी शाळेची हेड गर्ल हा गौरव प्राप्त केलेल्या शनया वसिष्ठच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संदीप पोतदार यांनी दहावीचे वर्ष शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे असताना शनयाने चित्र प्रदर्शनाचे केलेले धाडस याबद्दल अभिनंदन केले.

मान्यवरांच्या मनोगतानंतर प्रदर्शनातील उत्कंठा वाढविणाऱ्या दोन चित्रांचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यात ऑस्कर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नाटू नाटू व द एलिफंट व्हिस्परर्स या माहितीपटाचे शनया हिने काढलेल्या चित्रांचा समावेश होता. त्यामुळे रत्नचित्रावली या प्रदर्शनास वेगळीच झळाळी लाभली आहे. प्रास्ताविक शंतनू वसिष्ठ यांनी तर स्वागत नम्रता वसिष्ठ, डॉ.शिबी वसिष्ठ, पूर्वा वसिष्ठ यांनी रोप देऊन केले. सूत्रसंचालन वैशाली बोरसे यांनी तर आभार शनया वसिष्ठ हीने मानले. सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पालक, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हे प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.