श्रीमद्भगवद्गीता आणि आधुनिक जीवन सार

0

लोकशाही, विशेष लेख

 

श्रीमद्भगवद्गीता (Srimad Bhagavad Gita) म्हणजे आस्तिक्यवादावरच प्रबळ असं विज्ञान.. भक्तीच्या साहाय्याने अध्ययन आणि त्यातून स्वतःचा बौद्धिक विकास साधण्यासाठी ‘श्रीमद्भगवद्गीते सारखं दुसरं शिक्षण नाही’ असंही म्हटलं जातं. याचा संपूर्ण सारांश हा गीता महात्म्यामध्ये आढळतोच. श्रीकृष्णाने (Shri Krishna) अर्जुनाला प्रत्यक्ष रणभूमीत जो जीवन सार समजावून सांगितला, तोच जीवनसार म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय. अर्जुन हे विद्यार्थी दशेतलं स्वरूप आणि गुरूच्या भूमिकेत श्रीकृष्ण, अशी ही संगमावस्था भक्तीची एक नवी परिभाषा निर्माण करते.

गुरु कसा असावा तर श्रीकृष्णासारखा, आणि शिष्य कसा असावा तर अर्जुनासारखा (Arjuna) असं नेहमी म्हटलं जातं. या मागचं मूळ कारण असं की गुरुने ज्ञान देताना विद्यार्थ्याला त्याच्या सर्वांगीण विकासाला समजून घेऊन तसं परिपूर्ण ज्ञान देणं गरजेचं असतं. आणि शिष्यानेही मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता, कुठलाही द्वेषभाव अथवा स्वार्थ न ठेवता हे ज्ञान आत्मसात करून जीवन उद्धार करायचा असतो. अर्जुनाने श्रीकृष्णाकडून भगवद्गीता श्रवण केली आणि श्रीकृष्णानेही भगवद्गीता त्याच शब्दामृताने अर्जुनाला ऐकवली. ही गुरु शिष्याची परंपरा जगातील सर्व शास्त्रांमधील समग्र वैदिक ज्ञानाचा भांडार म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण त्यामध्ये असलेली सत्यता ही कोणत्याही काळात समरस अशीच आढळून येते.

सर्वसामान्यपणे भगवद्गीतेला इतर कोणत्याही गूढ अर्थाने न पाहता फक्त सरळ सरळ अर्थाने जरी समजून घेतली तरी त्यातील ज्ञान हे वैश्विक स्वरूपाचं असल्याचं सहज लक्षात येतं. जगातल्या कोणत्याही इतर ग्रंथांमध्ये इतक्या दीर्घ प्रमाणात ज्ञानसागराचा अनुभव मिळत नाही हेही एक वैश्विक सत्य म्हणता येईल. वास्तविक पाहायला गेलं तर श्रीमद् भगवद्गीतेला आस्तिक्यवाद विज्ञान असंही म्हटलं जातं. मात्र असे कित्येक नास्तिकही सापडतील ज्यांनी प्रत्यक्ष श्रीमद् भगवद्गीतेचा आधार घेऊन आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवलेली आहे. त्यामुळे हे फक्त ‘ज्ञान’ याच स्वरूपात विचारात घेतलं तर अधिक प्रभाव टाकू शकेल, यात दुमत नाहीच.

आस्तिक असणं किंवा नसणं हे त्या व्यक्तीच्या विचारांवर जरी अवलंबून असलं तरी श्रीमद्भगवद्गीते मध्ये असलेलं ज्ञान हे चराचरसृष्टीसाठी परिणामकारक असंच आहे, असं आवर्जून म्हणावं लागेल. कारण ज्ञान हे कुठल्याही प्रकारच्या भक्तीवर अवलंबून नसतं. एकवेळ भक्ती ही ज्ञानावर अवलंबून असू शकते. त्यामुळे एखादी व्यक्ती नास्तिक आहे म्हणून ती भगवद्गीतेला आणि तिच्यात असलेल्या भवसागर रुपी ज्ञानाला दुर्लक्षित करेल असं नाही. कारण आधुनिक काळात ज्ञान आणि भक्ती या दोन वेगवेगळ्या संकल्पना म्हणून उदयास येत आहेत. ज्ञान हे उत्तरोत्तर वाढत जाणार असं सत्य आहे, आणि श्रीमद् भगवद्गीता हा ज्ञानाचा प्रचंड भांडार आहे. त्यामुळे क्वचितच असा ज्ञानी आढळेल ज्याने भगवद्गीतेला दुर्लक्षित केलं असेल. त्यामुळे ज्ञान याच संकल्पनेतून आपण या सदरातून गीता समजून घेण्याचा ‘प्रयत्न’ करणार आहोत. प्रयत्न यासाठी की, तिला पूर्ण समजून घेण्याइतका समृद्ध व्यक्ती अजून तरी जन्माला यायचाय.

श्रीमद्भगवद्गीते मध्ये एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. या एकूण ७०० श्लोकांमध्ये जगातील सर्व समस्यांची उत्तरं सामावलेली आहेत, असं पूर्वापार अभ्यासू जणांकडून नेहमीच म्हणण्यात आलं आहे. श्रीमद्भगवद्गीता आणि तिच्यात सामावलेल्या ज्ञानाला काळाच्या कुठल्याही मर्यादा नाहीत, असंही आवर्जून म्हटलं जातं. कारण ज्या काळात श्रीमद् भगवद्गीता निर्माण झाली किंवा श्रीकृष्णाच्या तोंडून ती अर्जुनाला सांगितली गेली त्या अतिप्राचीन काळातील समस्या असोत, त्यानंतरच्या प्राचीन काळातील समस्या असोत, आधुनिक पूर्व काळातील समस्या असोत किंवा आताच्या आधुनिक काळातील समस्या असोत, या सर्व समस्यांची उत्तरं देखील श्रीमद्भगवद्गीतेच्या ज्ञानसागरात सहज आढळून येतात, हे तिच्या वाचकांना आणि समजून घेणाऱ्यांना नव्याने सांगायची गरज नाही. याच ज्ञानसागरातून प्रत्येक एका श्लोकाचे अल्प विश्लेषण आपण या ‘श्रीमद् भगवद्गीता आणि आधुनिक जीवन सार’ या सदरात नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वास्तविक श्रीमद् भगवद्गीता हे अशा गूढ ज्ञानाचं एकत्रीकरण आहे, ज्यातून काळाच्या वाढत्या वयानुसार तिचे नवनवीन अर्थ नव्या पद्धतीने उलगडून घेत आहेत. म्हणजे वयाच्या सत्तरीत असलेले आजोबा श्रीमद् भगवद्गीतेचं जे ज्ञान आकलन करतात त्याहून वेगळं किंवा त्याहून अधिक प्रभावी आकलन आताचा त्यांचाच १८-२० वर्षाचा नातू देखील नव्या पद्धतीने आणि आधुनिक स्वरूपाने समजून घेऊ शकतो, इतकं ते प्रगल्भ आहे. चला तर यात आपणही सहभागी होऊया, आणि गीता काही अंशी समजून घेण्याचा अट्टहास करूया.

राहुल वंदना सुनिल
८८०६८८६१६६

Leave A Reply

Your email address will not be published.