लोकशाही विशेष लेख
विद्वद्रत्न के. ल. दप्तरी यांनी उपनिषदांचा सखोल अभ्यास करून, उपनिषदांचा वेगळा अर्थ सांगितला आहे, तो असा –
जगाचे आदिकारण जे ब्रह्म, त्याचा विकास होऊनच जीव बनला. ब्रह्माच्या ठिकाणी आभास होऊन जीव बनला, असे उपनिषदांमध्ये सांगितलेले नाही. जीवावस्थेतच आनंदाचा अनुभव येऊ शकतो. म्हणून जीवस्थितीत आनंदाचा अनुभव कसा होईल, याच प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता उपनिषदे लिहिली गेली. जीवस्थितीचा पूर्णपणे उपभोग घ्यावा व पूर्ण आनंद भोगावा हेच उपनिषदांचे म्हणणे आहे. हा पूर्ण आनंद भोगण्याचा उपाय उपनिषदांमध्ये सांगितला आहे, तो असा की, आपणच सर्व जीवांमध्ये आहोत असे मानून, सर्वांच्या आनंदा करिता मरेपर्यंत कर्म करावे.
डॉ. गणेश थिटे यांनी उपनिषदांतील यातुधर्मात्मक घटकांची माहिती दिली आहे, ती अशी- प्राचीन, मुख्य उपनिषदांत यातुधर्मात्मक कर्मकांडही आढळते. अनरूप ब्रह्माची उपसना करण्याचा यात्वात्मक उपयोग आहे, असे तैत्तिरीया उपनिषदात (3. 10) सांगितले आहे. कौषीतकी ब्राह्मण उपनिषदात (1. 4) ब्रह्मज्ञान्याला मिळणा-या ऐंद्रिय उपभोगांचे कल्पनारम्य वर्णन केले आहे. बृहदारण्यक उपनिषदात (6. 4. 14) संततीच्या प्राप्तीयसाठी विधी सांगितले आहेत. कौषीतकी ब्राह्मण उपनिषदात दीर्घायुष्यप्राप्तीसाठी, पापनाशासाठी, शत्रुनाशासाठी अनेक प्रकारचे अभिचार विधीही सांगितले आहेत.
नव्य उपनिषदे – यज्ञप्रधान ब्राह्मणधर्माच्या उतरत्या काळात इतर वेदबाह्य तत्त्वज्ञानांची वाढ होऊ लागली होती. बौद्ध व जैन या धर्मांचे प्रचारक व आचार्य वैदिक धर्माला आव्हान देत होते. समाजात नव्या श्रद्धा, नवी देवते व नव्या उपासनापद्धती प्रचलित होऊ लागल्या होत्या; पण धर्माचरणाच्या या नव्या स्वरूपाला वैदिक धर्मात स्थान नव्हते.
या नव्या धर्माला समाजात मान्यता मिळवून द्यायची, तर त्यासाठी त्याला उपनिषदांचा आधार मिळवून देण्याची गरज होती. कारण, जुन्या उपनिषदांना उपासना व तत्त्वज्ञान या क्षेत्रांत प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्यामुळे नव्या संप्रदाय-प्रवर्तकांना वाटले, की आपल्या संप्रदायांच्या लोकमान्यतेसाठीही अशा उपनिषदांची गरज आहे. म्हणून त्यांनी आपापल्या संप्रदायाची उपनिषदे रचण्यास प्रारंभ केला. त्यामुळे उपनिषदांची संख्या वाढत गेली. वैदिक धर्माला विरोधकांच्या हल्ल्यांपासून वाचविण्याच्या उदात्त हेतूने ही नव्या उपनिषदे लिहिली गेली, असे म्हटल्यास त्यांचे महत्त्व लक्षात येईल. या नवरचनेत अथर्ववेदाच्या ऋषींचा पुढाकार होता हे आथर्वण उपनिषदांच्या मोठया संख्ये वरून दिसून येते.
या सांप्रदायिक उपनिषदांत विष्णू, सूर्य, शिव, देवी व गणपती या पंचदेवतांचे व त्यांच्या अवताराचे वर्णन आहे; त्या त्या देवतांचे पराक्रम, इतर देवांचा त्यांच्याशी संबंध, मूर्तिकरण पूजाविधी, मंत्र-यंत्र-तंत्र, गायत्रीमंत्र, अथर्वशिरस पूर्वोत्तरता- पिनी, इष्टवस्तू, अप्रिय वस्तू, प्रतीक, अभिषेकपद्धती, मानस- पूजा, इ. विषय आले आहेत. तसेच इतर देवता या उपास्य देवतेच्या अंगभूत मानून अखेर सगुण उपास्याचे निगुण निराकार परब्रह्माशी ऐक्य कल्पिलेले आहे. वैष्णव उपनिषदांत दशावतारांचे व त्या अवतारांच्या स्वतंत्र संप्रदायांचे वर्णन व त्याच्या आध्यात्मिक स्वरूपाचे स्पष्टीकरण असते.
सूर्य व विष्णू यांचे एकरूपत्व मान्य असूनही सौर उपनिषदांत त्याचे वेगळे महत्त्व सांगितले आहे. शैव उपनिषदांत शिवाची प्रसिद्ध रूपे आणि बटुक व शरभ ही अप्रसिद्ध रूपे, यांचे सविस्तर वर्णन आहे, शाक्त उपनिषदांत देवीच्या सौम्य व उग्र अशा उभय रूपाचे वर्णन आहे. गाणपत्य उपनिषदांत गणेशाच्या तांत्रिक उपासनेची सविस्तर माहिती असून, हेरंब या त्याच्या स्वरूपाचे स्वतंत्र वर्णन आहे.
अशा प्रकारे या नव्य उपनिषदात पंचायतनदेवतांना प्राधान्य दिलेले असले, तरी त्यांच्या अनुषंगाने इंद्र, अग्नी, काम, ज्वर, वासुकी, सोम, हनुमान, इ. देवतांचेही स्वरूप महत्त्व आणि सामर्थ्य वर्णिलेले आहे.
नव्य उपनिषदांत वक्ताइ, श्रोता व उपासक या नात्यांनी बरेच नवे ऋषी आढळतात. कित्येक देवता याच त्या उप कर्त्या या स्वरूपात दिसतात. नव्य उपनिषदांच्या या लेखकांनी केवळ देवताविषयकच उपनिषदे रचली नसून, योग, संन्यास व वेदान्त या विषयांवरही ती रचली आहेत. भक्तिविषयक स्वतंत्र उपनिषदे नसली, तरी सर्व उपनिषदांतून भक्तीचा ओघ वाहताना दिसतो. भक्तिकल्पनेत मूर्त व अमूर्त यांची पूजा, तसेच उपचारपूजा व मानसपूजा असे दोन्ही प्रकार पुरस्कारिलेले असून, देवतेच्या नामजपाचेही माहात्म्य सांगितले आहे. भक्ताला प्राप्त होणाच्या विविध लोकांची वर्णनेही तिथे आहेत. योगविषयक उपनिषदांत योगाची पंधरा अंगे व त्यांचे विवरण, तसेच योगावस्था, योगबंध, योगमुद्रा व कुंडलिनी जागृत करण्याचे विविध उपाय दिलेले आहेत. प्रणवाचेही महत्त्व प्रतिपादिले आहे.
संन्यासाचे सविस्तर वर्णन हे नव्य उपनिषदांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सृष्टीचक्र, बहूदक, इ. संन्याशांचे चढत्या श्रेणीचे प्रकार, त्यांची gदिनचर्या, r विधि-निषेध व त्यांना प्राप्त होणारा मोक्ष इ. गोष्टींचे विस्तृत वर्णन संन्यासविषयक उपनिषदांत आहे. वेदान्तपर उपनिषदांत जीवात्मा, परमात्मा, प्रणव, मुक्ती व तिच्या सात पाय-या, यांचे वर्णन आहे.
ही नव्य उपनिषदे गद्यपद्यात्मक असून, त्यांतला गद्य भाग मोठा आहे. पद्यरचनेत प्रामुख्याने अनुष्टुभ छंद आढळतो. कधी संवादरूपाने, कधी उपदेशरूपाने, कधी सरळ व्याख्यानरूपाने, तर कधी प्रश्नाचे उत्तर या रूपाने त्यांची झालेली आहे. त्यांची भाषा सोपी, मनोवेधक, समर्पक उदाहरणांनी युक्त व क्वचित अलंकारिक असते. त्या त्या उपनिषदांची फलश्रुती आकर्षक वाटावी, अशा प्रकारे दिलेली असते. धर्मार्थकाममोक्षांची प्राप्तीक, हा या उपनिषदांच्या अभ्यासाचा उद्देश आहे. सर्व उपनिषदांचा अद्वैतावरच भर आहे.
सृष्टिनिर्माणशास्त्र व जीवाची मरणोत्तर अवस्था, या बाबतीत जुन्या उपनिषदांचे सिद्धांत गृहीत धरून नव्य उपनिषदे तेच नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्नी करतात. सर्व मार्ग मोक्षाकडेच जातात, हे तत्त्व नव्य उपनिषदांनी सूचित केले आहे.
ही नव्य उपनिषदे गौण असली, तरी ती उपेक्षणीय नसून, अनेक दृष्टींनी अभ्यसनीय आहेत. हिंदूच्या सांप्रतच्या पौराण धर्माला त्यांनीच प्रामाण्य प्राप्त करून दिले आहे. हिंदूच्या सामाजिक व धार्मिक इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत भारती, जळगाव
दूरध्वनी नं. 0257-2236815