एकनाथराव खडसेंच्या मदतीने लोकसभा जिंकू !

पवारांनी उमेदवारी देण्याचा दिला शब्द : संतोष चौधरी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून आपल्याला उमेदवारी दिली जाईल असा शब्द शरद पवारांनी दिला असून ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मदतीने आपण विजय संपादन करु अशी माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली. आज सकाळी ते मुंबईहून शहरात दाखल झाले त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चौधरी म्हणाले की, शरद पवारांनी मला ग्रीन सिग्नल दिला असून उद्या नावे जाहीर झाल्यानंतर दौरा सुरू होईल. रावेरची जागा आपल्याला जिंकायची आहे. जीवाचे रान करू आणि कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा प्रयत्न केला जाईल.  गेल्या 10 वर्षात रावेर लोकसभा मतदारसंघातील विकास रखडला आहे. पहिल्यांदाच भुसावळ शहराला लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याने शहरात एकतर्फी मतदान होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकनाथराव खडसे आमच्या सोबत आहे; त्यामुळे चिंता करण्याचे काम नाही. विद्यमान खासदारांच्या कामावर जनता समाधानी नसून विरोधकच मला मदत करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समर्थकांनी केले स्वागत…

महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चितीचे संकेत मिळाल्यानंतर  माजी आमदार संतोष चौधरी बुधवारी भुसावळला आले. रेल्वेस्थानकावर आगमन होताच समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. यावेळी संतोष चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ताजोद्दीनबाबा दर्गा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  केले.

यावेळी प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष अनिल चौधरी, शिवसेना उबाठा गटाचे शहराध्यक्ष दीपक धांडे, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, विनोद निकम, उल्हास पगारे, संगिता भारंबे, दुर्गेश ठाकूर, कृऊबा माजी सभापती सचिन चौधरी यांच्यासह रावेर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

पूर्वी एकनाथराव खडसे आणि माझे पक्षीय मतभेद होते परंतु आता आम्ही एका पक्षात असून ते मला मदत करतील. पक्षाच्या आदेशानुसार ते आम्हाला सहकार्य करतील. कोणालाही उमेदवारी जाहीर झाली तरी मी त्याच जोमाने काम करेल.

– संतोष चौधरी, माजी आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.