जळगाव जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारणी

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजप नगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे जळगाव जिल्हा पूर्वीचे अध्यक्ष अमोल जावळे आणि जळगाव जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी जिल्ह्याचे तिन्ही विभागाची जम्बो कार्यकारणी घोषित केली आहे. भाजप महानगर जिल्हा कार्यकारणी एकूण ३७ पदाधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १४ चिटणीस आणि १ कोषाध्यक्ष असा समावेश आहे. पूर्व जळगाव जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी एकूण ३४ पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यात १३ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, १५ चिटणीस आणि १ कोषाध्यक्ष असा समावेश आहे. पश्चिम जळगाव जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी २३ पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यात ९ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस आणि १० चिटणीस असा समावेश आहे. आता पर्यंत जिल्हा महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष असे दोन भाजपचे जिल्हाध्यक्ष असायचे, परंतु यंदा जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागासाठी आणि पश्चिम भागासाठी अर्थात दोन लोकसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र दोन जिल्हाध्यक्ष आणि जळगाव शहरासाठी महानगराध्यक्ष असे तीन जिल्हाध्यक्ष निवडून भाजपने त्यांच्यावर संघटनेची स्वतंत्र जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन जुन्या कार्यकर्त्यांना फार मोठा धक्का देण्यात आलेला आहे. भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणता येईल. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे सदस्य होय. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना गुलाबराव पाटील आणि जळकेकर महाराज यांची मैत्री सर्वश्रुत आहे. तथापि मंत्री गुलाबराव पाटील आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यात काही कारणास्तव मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. जळकेकर महाराज यांचे वक्तृत्व जोरदार आहे. आपल्या भाषण शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. हिंदुत्व हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. भाजपात नव्याने आलेल्या जळकेकर महाराजांना जिल्हाध्यक्षपदी संधी दिल्याने जुन्या चेहऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे. जळकेकर महाराज यांना पश्चिम जिल्हा अध्यक्ष करण्यामागे भाजपने शिवसेना शिंदे गटाला शह दिला आहे. विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना फार मोठा शह आहे. पश्चिम जिल्ह्यात एरंडोल, धरणगाव, जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा आणि अमळनेर हे तालुके येतात. त्यामध्ये पाचोरा, जळगाव ग्रामीण आणि पारोळा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. लोकसभा अध्यक्ष अथवा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची वेळ आलीच तर जिल्हाध्यक्ष जळकेकर यांचा उपयोग होऊ शकतो.

 

पूर्व जिल्हा भाजपचे अध्यक्षपदी माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे या नव्या चेहऱ्याला संधी दिली. कै. हरिभाऊ जावळे यांचा फार मोठा समर्थक वर्ग आहे. त्या समर्थकांची सहानुभूती अमोल जावळे यांच्या नियुक्तीने भाजपने साधली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कै. हरिभाऊ जावळे यांना रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने अधिकृत उमेदवारी घोषित केली होती. तथापि ऐनवेळी तत्कालीन भाजप नेते आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कै. हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी रद्द करून सुनबाई रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची अधिकृत उमेदवारी मिळवून दिली, हे सर्वश्रुत आहे. त्यावेळी कै. हरिभाऊंनी उमेदवारी ऐनवेळी रद्द केल्यामुळे भाजप गोटात चर्चेचा विषय बनला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेत रक्षा खडसे या २०१४ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. परंतु कै. हरिभाऊ जावळे यांच्यावर अन्याय झाला, ही भावना कार्यकर्त्यांमध्ये सलत होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रावेर विधानसभा मतदारसंघातून कै. हरिभाऊ जावळे यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली. परंतु दुर्दैवाने त्यांचा त्यात पराभव झाला. या पराभवाने कै. हरिभाऊ कमालीचे नाराज झाले. त्या पराभवाने ते खचले आणि कोरोना महामारीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा भरात भाजपच नव्हे तर सर्वच पक्षात हरिभाऊंच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत होती. भाजपची एकनिष्ठ असलेले कै. हरिभाऊ जावळे यांना खऱ्या अर्थाने त्यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना जिल्हाध्यक्ष करून भाजपने एक अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे. अमोल जावळे यांची रावेर विधानसभा तसेच रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून चर्चा सुद्धा होत आहे. विद्यमान भाजप खासदार रक्षा खडसे यांना २०२४ मध्ये भाजपची उमेदवारी मिळेपर्यंत उलट सुलट चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासंदर्भात भाजप वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे अमोल जावळे यांना मोठी संधी आहे. जळगाव शहर जिल्हा महानगराध्यक्षपदी माजी नगरसेवक आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ता उज्वला भेंडाळे या लेवा पाटील समाजातील नवीन महिला चेहऱ्याला संधी देऊन महिलेचा सन्मान केला आहे. जळगाव शहराचे भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे. भाजपने केलेल्या सर्वेत जळगाव आणि भुसावळ मतदार संघाविषयी निगेटिव्ह अहवाल आला असल्याने राजू मामा भोळे यांना पर्याय शोधला जाईल असे दिसते…!

Leave A Reply

Your email address will not be published.