मॅफेड्रॉनचा कारखाना उद्ध्वस्त ; 267 कोटींचा अमली साठा जप्त

0

नाशिक : एमडी तथा मॅफेड्रॉन अमली पदार्थ तस्करीचा मुंबई पोलिसांनी भंडाफोड केला आहे. नाशिक पोलिसांना कारवाईची खबर लागू न देता मुंबईच्या पथकांनी शहरातील कारखाना उद्ध्वस्त केला असून, या कारवाईत एकास अटक करून तब्बल २६७ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुणे पोलिसांच्या हातावर तुरी दैऊन फरार झालेला बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा हा कारखाना असल्याचे बोलले जात असून, हा व्यवसाय सांभाळणारा त्याचा भाऊ पोलिसांची चाहूल लागताच पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केला होता. एका संशयिताला ताब्यात घेत त्याचा पाठपुरावा केल्याने या तस्करीच्या भंडाफोडासह कारखाना उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. साकीनाका पोलिसांनी या साखळीतील बारा जणांना बेड्या ठोकत नाशिक गाठून ही कारवाई केली. साकीनाका पोलिसांची पथके बुधवारी मध्यरात्री शिंदे गावात येऊनधडकली होती. एमआयडीसीतील एका कारखान्यावर छापा टाकला. हा कारखाना ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा असल्याचे बोलले जाते. त्याचा लहान भाऊ भूषण पाटील
कारखाना चालवत होता. ही जागा यादव नामक व्यक्तीच्या मालकीची असून, ललितने ती भाडेतत्त्वावर घेतल्याचे समजते.. या ठिकाणीभूषण पाटील हा कच्चा माल मागवून त्यापासून मॅफेड्रॉन तयार करत असे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या जिशान इक्बाल शेख (३४) या कामगाराच्या सहकार्याने हा व्यवसाय सुरू केला होता. साकीनाका पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, छाप्याची कुणकूण लागताच भूषण पाटीलही फरार झाला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी १३३ किलो वजनाच्या एमडी नावाच्या घातक अमली पदार्थासह साहित्य असा सुमारे २६७ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून, ललित हा पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर भूषण पाटीलने कारखान्यातील तयार माल आणि सामग्रीची विल्हेवाट लावली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. साकीनाका पोलीस तीन दिवसांपासून नाशिक रोड परिसरात तळ ठोकून होते. अमली पदार्थांचा कारखाना सुरू असताना स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

महिनाभरात ३०० कोटींचा मुद्देमाल जप्त

ड्रग्जमाफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याचे नाशिक कनेक्शन समोर आले. मात्र तत्पूर्वीच गेल्या महिन्यात अन्वर सय्यद हा ड्रग्ज रॅकेटमधील साथीदार हाती लागल्याने पोलीस कारखान्यापर्यंत पोहोचले. वेगवेगळ्या भागातून बारा जणांना बेड्या ठोकत पोलिसांनी या कारवाईत अवघ्या महिनाभरात आंतरराष्ट्रीय बाजार मूल्यानुसार तब्बल ३०० कोटी २६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.