वाढत्या तापमानाचा केळी भागांना फटका

0

लोकशाही संपादकीय

 

एप्रिल महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढतोय. तापमान 40° पेक्षा जास्त आणि 42 43 अंश सरासरीपेक्षा तर कधीकधी 45 अंशावर जाते. महाराष्ट्रात जळगाव (Jalgaon) जिल्हा सर्वात हॉट म्हणून ओळखला जातो. अजून अख्खा मे महिना बाकी आहे. 50° पर्यंत तापमान जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील रावेर (Raver), यावल (Yawal), मुक्ताईनगर (Muktainagar) हे तालुके केळी पिकाचे आगार समजले जातात. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीने केळीचे उत्पादन(Banana production) करतात. कधी आसमानी, सुलतानीच्या संकटांशी वारंवार केळी उत्पादकांना सामना करावा लागतो. कधी गारपीट, वादळाने हाती आलेल्या केळीचे पीक उध्वस्त होते. कधी कधी पावसाच्या तडाख्याने केळी उत्पादनावर परिणाम होतो. तर कमी पावसामुळे केळी पिकासाठी पाण्याचा साठा कमी पडल्याने केळी पीक उत्पादन घटते. त्यातच आज पर्यंत केळी पिकावर कशाचाही कसलाही रोगाचा प्रादुर्भाव होत नव्हता. परंतु गेल्या काही वर्षापासून करपा रोगाने केळीला ग्रासले आहे. त्यामुळे करपा रोगावर नियंत्रण आणण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या औषधावरील खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच केळीच्या बागांवर भावा संदर्भात अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात.

आता प्रत्येक वर्षाला तापमानाचा पारा वाढत असल्याने केळी उत्पादक शेतकरी वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी अक्षरशः संपूर्ण केळी बागेला नेटचे संरक्षण देऊन वाढत्या तापमानापासून केळीचे पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. वाढत्या तापमानामुळे केळीचे भाव कमालीच्या घसरले आहेत. रावेर यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक केळी उत्पादक झालेले आहेत. वादळ-वारा, गारपीट आदीमुळे केळीचे खोड जमीनदोस्त होतात. तेव्हा केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला शासन धावून जाते. केळीच्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे केले जातात. पंचनामाच्या अहवालानुसार केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासन अनुदान देते. शासनाच्या या मदत रुपी अनुदानाने शेतकरी समाधानी होत नसला तरी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात अशी मदत शेतकऱ्यांना मिळते. आता वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक हैराण झाला आहे. कापणीला आलेली केळी पिकाचे उन्हामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे केळीला भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत केळी उत्पादक शेतकऱ्याने काय करावे? असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे वाढत्या तापमानापुढे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा होणाऱ्या नुकसानीकडे सुद्धा शासनाने सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. त्याचा शासन स्तरावर विचार होण्याची गरज आहे.

जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक जिल्हा असला तरी केळीचे भाव मात्र मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून जाहीर केले जातात. आता केळीचे भाव महाराष्ट्रातील विशेषता जळगाव जिल्ह्यातून जाहीर केले जावेत ही मागणी आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन बऱ्हाणपूर ऐवजी जळगाव जिल्ह्यातून केळीचे भाव जाहीर होण्यासाठी प्रयत्न करावे. जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रेसर असताना जिल्ह्यातील केळीच्या दर्जा वाढण्यासाठी तसेच जिल्ह्यातील केळी परदेशात निर्यात होण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे ते झाले नाहीत. त्यामुळे केळी उत्पादक एकीकडे महाराष्ट्रापेक्षा मागे असलेल्या गुजरात राज्याने भरारी मारली आणि महाराष्ट्रापेक्षा गुजरातपर्यंत केळी निर्यातीत आघाडी घेतली आहे. त्याचे आत्मपरीक्षण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या केळीचा दर्जा तिची प्रत वाढवण्यात दृष्टीने शासनाकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते दिले जात नाही. फक्त पोकळ घोषणा केल्या जातात. त्यामुळे जळगावचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीचा दर्जा तसेच उत्पादन वाढवण्यासाठी आणि केलेला स्थिर भाव मिळण्यासाठी यापुढे प्रयत्न झाले नाहीत, तर जिल्ह्यातील केळी पिकाचे क्षेत्र घटत जाऊन केळी ऐवजी इतर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल राहील. त्याला आपल्या शासनाचे धोरण जबाबदार राहील…!

Leave A Reply

Your email address will not be published.