दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची  (Dawood Ibrahim) माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) (National Investigation Agency) केली आहे.  दाऊदसोबतच कुख्यात गुंड छोटा शकील (Chhota Shakeel) याच्यावर २० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदनं सध्या एक युनिट स्थापन केली असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. येत्या काळात भारतात दहशतवादी हल्ला किंवा देशातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्लान या युनिटकडून राबवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनआयए सतर्क झाली असून भारतासाठी वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख रुपये रोख, तर छोटा शकीलची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपये देण्यात येतील. तसंच हाजी अनिस, जावेद चिकना आणि टायगर मेनन (Tiger Memon) यांच्यावर प्रत्येकी १५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

पाकिस्तानातील कराची येथे राहणारा आणि १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी वाँटेड असलेला इब्राहिम याच्यावर २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं २५ लाख डॉलरचं बक्षीस याआधीच जाहीर केलं आहे. दाऊद भारतातील मोस्ट वॉन्टेड पुरुषांपैकी एक आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद (जेएम) प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा साथीदार अब्दुल रौफ असगर हे देखील मोस्ट वॉन्टेड आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.