रावेर लोकसभेसाठी संतोष चौधरींचे नाव आघाडीवर?

राष्ट्रवादी बुधवारी करणार उमेदवारांची घोषणा : विनोद सोनवणेंचीही फिल्डिंग

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) गटातर्फे उमेदवारांचा शोध सुरु असतांना भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावावर खल सुरु असून त्यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुसरीकडे मुक्ताईनगर येथील ठेकेदार विनोद सोनवणे हे देखील उमेदवारसाठी जोरदार फिल्डिंग लावून आहेत.
भाजपाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीनेही सक्षम उमेदवाराचा शोध सुरु केला आहे. सुरुवातीची काही नावे मागे पडली आहेत. दोन दिवसांपासून राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर आली असून ते सक्षम उमेदवार देण्यावर भर देत आहेत. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावावर श्रेष्ठी काय निर्णय घेतात हे उत्सुकतेचे ठरणार असले तरी त्यांचे पारडे जड मानले जात आहे. चौधरी यांना निवडणुकीचा अनुभव असून या मतदारसंघात त्यांचा बऱ्यापैकी संपर्क देखील आहे.

राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीला नकार दिल्याने पक्ष नव्या उमेदवाराचा शोध घेत असतांनाच संतोष चौधरी यांनी इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नाव आघाडीवर आले आहे. भुसावळ तालुक्यातील बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर संतोष चौधरी यांची पकड असल्याने त्याचा लोकसभेसाठी उपयोग होवू शकतो. रावेर, यावल व भुसावळ तालुक्यात त्यांच्या परिवाराकडून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून ते जनतेच्या संपर्कात कायम असल्याने त्यांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा मिळू शकतो.

रवींद्रभैय्यांना पुन्हा विचारणा
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सुरुवातीपासूनच उमेदवारी घेण्यास नकार दिला असल्याने पक्षश्रेष्ठीही अचंबित झाले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकीत ॲड. रवींद्र पाटील यांच्या नावावर चर्चा देखील झाल्याने त्यांना पक्षाने पुन्हा विचारणा केली आहे. याबाबत रवींद्र पाटील यांनी अद्यापही श्रेष्ठींना होकार भरला नाही.

विनोद सोनवणेंची फिल्डिंग
मुक्ताईनगर येथील ठेकेदार व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनोद सोनवणे यांनी उमेदवारीसाठी श्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली असून त्यासाठी ते वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावून आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून ते श्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचे कळते. श्री. खडसे विनोद सोनवणे यांच्या बाबत काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे.

रावेर लोकसभेची निवडणूक भाजपासाठी सोपी ठरू नये यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. श्री. चौधरी यांच्या नावाबाबत अधिकृतरीत्या घोषणा झाली नसली तरी शरद पवारांकडून चौधरी यांना कामाला लागण्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त भुसावळात धडकताच सोमवारी दुपारी चौधरींच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

पवारांशी चर्चा.. भुसावळात जल्लोष
महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार म्हणून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे पाहिले जात आहे. शरद पवार यांनी चौधरी यांना बोलावत त्यांच्याशी याबाबत चर्चादेखील केल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.