काळीमा .. उज्जैनमध्ये बारा वर्षीय मुलीवर बलात्कार

0

पीडितेची अडीच तास मदतीसाठी याचना; साधुला आली दया

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एक बारा वर्षीय मुलगी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती. तिच्यावर बलात्कार झाला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजनुसार बलात्कारानंतर रक्तबंबाळ अवस्थेत विवस्त्र अवस्थेत ही मुलगी लोकांकडे मदत मागत होती. परंतु तिला मदत करण्याऐवजी लोक हुसकावून लावत होते.

पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडनगर रोडवर ही मुलगी गंभीर अवस्थेत आढळली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी इंदौरला पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. ही घटना २५ सप्टेंबर रोजीची आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका कॉलनीतून दुसऱ्या कॉलनीत सुमारे अडीच तास ती मुलगी मदत मागत फिरत होती. परंतु कोणीही तिला मदत केली नाही. अखेर दांडी आश्रमाजवळ ती बेशुद्ध होऊन कोसळली. आश्रमातील एका साधूने तिच्या अंगावर गळ्यातील मफलर टाकली आणि पोलिसांना कळवले. ही मुलगी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील असल्याचे प्राथमिक तपासात

समोर आले आहे. आपल्या आईसोबत देखील दुष्कृत्य झाल्याचे तिने सांगितले. परंतु ती अधिक काही बोलण्याच्या स्थितीत नसल्याने तिची आई कुठे आहे, ती उज्जैनला कशी आली, हे कळू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काँग्रेसने या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य करत भाजपच्या राज्यात कायदा- सुव्यवस्था ढासळली असल्याची टीका केली.

काय दिसले फुटेजमध्ये ?

दरम्यान पिडीत मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत तिरुपती ड्रीम्स कॉलनीच्या परिसरात चालत होती. तिच्या अंगावरील कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या झाल्या होत्या. तशा अवस्थेत ती लोकांकडे मदतीची याचना करत होती. परंतु लोक तिला मदत करण्याऐवजी हुसकावून लावत असल्याचे दिसून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.