शिक्षकांसाठी पुन्हा ब्रिटिश कौन्सिलचे ट्रेनिंग सुरू व्हावे – पोद्दार स्कूलचे प्रिन्सिपल गोकुळ महाजन यांची मागणी :

समाज आणि विद्यापीठ यांचा संवाद व समन्वय वाढावा : कुलगुरू प्रा.डॉ. व्ही. एल. माहेश्वरी

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

स्वप्नातील जळगाव

 

आपल्याला स्वप्नातील जळगाव साध्य करायचं असेल तर उत्कृष्ट विद्यार्थी घडवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. या माध्यमातून जळगावच्या शैक्षणिक विकासात फार मोठी भर पडेल. हे प्रशिक्षण सर्व माध्यमाच्या शाळा शिक्षकांसाठी शासनातर्फे आयोजित करण्यात यावे. यातून शिक्षकांची प्रगती होण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या विकासाला देखील फार मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे लीड कोल्याबोरेटर प्रिन्सिपल गोकुळ महाजन यांनी केले. ते सायंकाळी लोकशाहीच्या कार्यालयात आरतीसाठी उपस्थित होते.

पुढे बोलताना गोकुळ महाजन म्हणाले, जळगावच्या विकासात एक शिक्षक म्हणून आमची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे साधन आहे, आणि जळगावच्या एकंदर विकासासाठी, स्वप्नातील जळगाव साध्य करण्यासाठी उत्कृष्ट विद्यार्थी घडवणे ही महत्त्वाची गरज राहील. एक शिक्षक म्हणून आम्हाला ती भूमिका स्वीकारावी लागणार आहे. शिक्षक म्हणून आगामी काळात देखील अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी आणि प्रभावी असे विद्यार्थी घडवणे या भूमिकेतून आम्ही जळगावच्या विकासाला हातभार लावू शकतो. जेणेकरून स्वप्नातील जळगाव ही संकल्पना सत्यात उतरेल.

स्वप्नातील जळगाव या संकल्पनेबद्दल बोलताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही एल माहेश्वरी म्हणाले, स्वप्नातील जळगाव साध्य करण्यासाठी समाज आणि विद्यापीठ यांचा संवाद आणि समन्वय वाढणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या सामान्य गरजा असतात त्या अनुषंगाने छोट्या स्वरूपात का होईना, अभ्यासक्रम तयार करता येऊन त्यावर अंमलबजावणी होणे गरजेचे राहील. यातून शैक्षणिक विकासात अधिक भर पडेल. सोबतच जवळपासच्या गावांना देखील या प्रक्रियेत सामावून घेतले जाईल.

पुढे बोलतांना कुलगुरू म्हणाले, विद्यापीठात नुकतेच इंक्युबॅशन सेंटर सुरू करण्यात आले असून या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाऊन विद्यार्थ्यांना स्टार्टअप या संकल्पने अंतर्गत रोजगार निर्मितीसाठी प्रेरणा दिली जात आहे. विद्यार्थ्यांनी याचा अवश्य फायदा घ्यावा, जेणेकरून जळगावच्या विकासात याचा मोलाचा वाटा राहील. आजच्या घडीला विद्यापीठांतर्गत इंक्युबॅशन सेंटरच्या माध्यमातून ६२ स्टार्टअप सुरू करण्यात आले असून ४ हे स्टार्टअप हे पूर्णपणे यशस्वीरित्या सुरू झाले आहेत. ही एक प्रकारची यशाची पहिली पायरी म्हणता येईल.

दरम्यान जळगावच्या विकासात एक शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणून कुलगुरू पदावरून आवश्यक त्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.