लहानपणी आरतीनंतर पोट भरेल इतका प्रसाद मिळायचा – कुलगुरू विजय माहेश्वरी यांनी सांगितली आठवण :

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

प्रा. डॉ. विजय एल. महेश्वरी

कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

 

गोकुळ महाजन

मुख्याध्यापक, पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव

 

माझं बालपण बऱ्हाणपूर येथे गेलं. तिथे मोहल्यात प्रत्येक घरात गणपती बसवले जात असत. आमची शाळेच्या मुलांची एक टोळी होती. ती टोळी प्रत्येक घरोघरी जाऊन आरती म्हणत असे आणि प्रसाद घेत असे. पंधरा-वीस घरांमध्ये जाऊन आरती करून मिळालेल्या प्रसादाने अक्षरशः पोटभर जेवण केल्यासारखं समाधान मिळत असे. ते बालपणीचे गणेशोत्सवाचे पाच सहा वर्ष माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारे आहेत, अशी आठवण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांनी सांगितली.

लोकशाहीच्या कार्यालयात ते सायंकाळी गणरायाच्या आरतीसाठी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे लोकशाहीच्या कार्यालयात शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात येते. यासाठी काल कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांचे सह पोतदार इंग्लिश मीडियम स्कूलचे लीड कोलाब्रेटर प्रिन्सिपल गोकुळ महाजन हे देखील उपस्थित होते. त्यावेळी दोघांनी आपल्या आठवणीतील गणपतीच्या स्मरणिका कथन केल्या.

कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले, बालपणीच्या आठवणींसह गणपतीपुळे येथील सायंकाळची आरती माझ्यासाठी अविस्मरणीय अशी ठरली आहे. सायंकाळच्या वेळेला गणपतीपुळे येथे आम्हाला निसर्गरम्य परिसरात श्री गणरायाची आरती करण्याचा आलेला अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा असा आहे.

यावेळी आठवणीतील गणपती बद्दल आपलं मत व्यक्त करताना पोदार इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल गोकुळ महाजन म्हणाले, माझे गुरु विष्णू तात्याराव धर्माधिकारी यांनी मला रुई मदरच्या बुंध्याशी बारा वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेली मूर्ती दान दिली आहे. ही मूर्ती माझ्यासाठी अत्यंत भाग्यकारक अशी आहे. ती देताना मला माझ्या गुरूंनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते, या गणेश मूर्तीमुळे माझ्या हातून मोठ-मोठे समाजकार्य आणि देशसेवा होईल. त्याचप्रमाणे माझ्या पुढच्या दहा पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती मला कमावता येईल, असा आशीर्वाद दिला होता.

त्यामुळे आज मी या गणेश मूर्तीमुळे वैयक्तिक जीवनात सातत्याने ‘मी समाजासाठी काय करू शकतो’ अशी सकारात्मक भूमिका घेऊन प्रयत्न करत असतो. हाती घेतलेला काम मी या गणरायाच्या आशीर्वादाने सहज पार पाडून आज समाजसेवेचा एक वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे. या मूर्तीमुळे मला माझा सकारात्मक विश्वास प्राप्त झाला आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Leave A Reply

Your email address will not be published.