केंद्रीय मंत्री गुरूंच्या भेटीला घरी

0

वाकोद ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विशाल जोशी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चौथी – पाचवीत असताना शिकवणारे शिक्षक जवळून जात असलेल्या गावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दानवे यांनी त्यांचा ताफा आपल्या गुरुंच्या भेटीसाठी त्यांच्या घरी वळवला आणि गुरू शिष्यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जळगाव जिल्ह्यातील जामनेर दौऱ्यावर असताना नाचनखेड गावात ही गुरू-शिष्याची भेट झाली. मंत्री दानवे हे मुद्दामहून वेळ काढून आपल्या गुरुंच्या भेटीसाठी या गावात राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत पोहचले. आपण शिकविलेला व घडवलेला विद्यार्थी देशाच्या राजकारणात एवढ्या मोठ्या पदावर पोहचल्याचे पाहून त्याकाळचे शिक्षक यूसुफ रहेमान पटेल यांनी अभिमान व्यक्त केला. एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील माझी आठवण ठेवली. हे माझ्यासाठी खरोखरच अभिमानास्पद असून मी शिकवणे सार्थकी लागले, अशा शब्दात त्यांनी आपल्या शिष्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

सुरुवातीला गुरू-शिष्याच्या भेटीचा प्रसंग रावसाहेब दानवे यांनीच फेसबुकच्या माध्यमातून समोर आणला. दानवे यांनी त्यांच्या भेटीवर बोलताना सांगितले की, जामनेर दौऱ्यावर असताना मला सरांची आठवण झाली, कार्यक्रमात व्यस्त असताना देखील मी त्यांना भेटावेच असे मला वाटले. त्यामुळे नाचनखेड येथे माझे शालेय शिक्षक यूसुफ रेहमान पटेल यांची आणि त्यांच्या परिवारातील सर्वांची भेट घेतली. त्यांना मला व माझ्या सोबतचा शासकीय लवाजमा पाहून मोठा आनंद झाला होता. आजकालच्या काळात गुरू -शिष्याचे नाते लोप पावत चालले आहे. मी कितीही पदाने मोठा झालो तरी त्यांच्याविषयी आजही मला जेव्हा मी विद्यार्थी होतो तेवढाच आदर आहे.

भेटीच्या निमित्ताने आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हे शिक्षक माझ्या लहानपणी जवखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मला ४ थी व ५ वी ला शिकवायला होते. आज त्यांनी माझ्याजवळ मी तुला शिकवले त्याचा मला अभिमान वाटतो. माझी शिकवण सार्थकी लागली, अशा भावना व्यक्त केल्या, मला देखील भरून आले. लहानपणी ज्यांनी शिक्षणाचे धडे दिले, त्या गुरुजींची इतक्या वर्षानंतर झालेली भेट सुखावणारी होती. आपला विद्यार्थी राजकारणात मोठ्या पदावर पोहचला याचा सार्थ अभिमान आणि आनंद यूसुफ पटेल सरांच्या चेहऱ्यावर दिसत होता, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

दरम्यान आजच्या काळात देखील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे, असा संदेशदेखील दानवे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.