खासदार रक्षा खडसेंचे घुमजाव अपेक्षितच होते..!

0

लोकशाही संपादकीय लेख

माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप घर वापसी करावी, असे आवाहन सुनबाई खासदार रक्षा खडसे यांनी केले. इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. एकनाथ खडसे तर मूळ भाजपचेच आहेत. महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे घर वापसी करावी असे केलेले वक्तव्य अवघ्या 24 तासात खासदार रक्षा खडसेंनी घुमजाव केले. मी तसे आवाहनच केले नव्हते. पत्रकारांनी “नाथाभाऊंची घर वापसी होईल का?” असे विचारले असता, “होऊ शकते” एवढेच मी बोलले होते. मी त्यांनी भाजपात पुन्हा घर वापसी करावी, असे आवाहन केलेले नाही. असे स्पष्ट करून आपले वक्तव्य बदलून टाकले हे अपेक्षितच होते. कारण जळगाव जिल्ह्याचे भाजपनेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि एकनाथराव खडसे यांचे राजकारणात विळा भोपळ्याचे नाते असल्यामुळे एकनाथराव खडसे यांना पुन्हा भाजपा संधी देतील अशी सुताराम शक्यता नाही. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंच्या घरवापसी संदर्भात विधान तर केलेच पण ते अंगलट येत असल्याने पाहून त्यांनी घुमजाव केले. “मी असे बोललेच नाही” असे सांगत, महाराष्ट्रात गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस आदी वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील असे सांगून खासदार रक्षा खडसे यांनी आपली बाजू पलटवली, हे अपेक्षितच होते. कारण लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा तिसऱ्यांदा २०२४ च्या निवडणुकीसाठी खासदार रक्षा खडसे यांना तिकीट मिळवण्या संदर्भात भाजपमध्ये उलट चर्चा सुरू आहे. भाजप तर्फे रावेरसाठी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे खासदार रक्षा खडसेंची उमेदवारी तळ्यात मळ्यात असताना एकनाथराव खडसे यांचे संदर्भात विधान करून पायावर धोंडा टाकून घेण्याचे निदर्शनास येताच आपली आणि भाजपच्या वरिष्ठांकडून कान उघडणी करताच रक्षा खडसेंनी घुमजाव केले, हे स्पष्ट आहे. खासदार रक्षा खडसे यांना भाजपने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेसाठी भाजपची उमेदवारी दिली. त्या प्रचंड मताधिक्याने निवडूनही आल्या. परंतु त्यांचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झालेला विजय असल्याने भाजप तर्फे सांगण्यात येते. त्यामुळे आता महाराष्ट्रात परिस्थिती बदललेली आहे. शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार घटक भाजप सोबत असल्याने जागावाटपात आता विभागणी होणार आहे. त्यातच खासदार रक्षा खडसे या जरी भाजपशी एकनिष्ठ असल्या, तरी त्या राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या सून आहेत. त्यामुळे त्यांच्या रावेर लोकसभा उमेदवारीबाबत संकेची पाल चूकचुकत आहे. त्यामुळे सुद्धा खासदार रक्षा खडसेंनी एकनाथराव खडसेंच्या घरवासी संदर्भात घुमजाव केले असावे..

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपात येतील याची शक्यता वाटत नाही. कारण भाजपात झालेल्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन केले. एकनाथराव खडसे यांची कन्या एड. रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्त केले. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या महाविकास आघाडीत महाराष्ट्रात प्रचंड अशी सहानुभूती मिळते आहे. त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून एकनाथराव खडसे यांचे नाव आघाडीवर आहे. कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपात घर वापसी करण्याची शक्यता नाही काही. दिवसांपूर्वी स्वतः एकनाथराव खडसे यांनी यासंदर्भात खुलासा करून भाजप पारदर्शकतेवर पडदा टाकलाच आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वावड्यांना काही अर्थ नाही. उलट एकनाथराव खडसेंना जाणीवपूर्वक विविध मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची युती सरकार करत आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना निवडणूक लढविता येणार नाही अशी तांत्रिक अडचण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याचाच एक भाग म्हणजे १३७ कोटी रुपयांच्या गौण खनिज दंडाचे प्रकरण होय.. पाहूया काय होते घोडा मैदान जवळच आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.