राज ठाकरेंना न्यायालयाचा दणका; अजामीनपात्र वारंट जारी…

0

 

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज ठाकरे यांना सांगलीच्या शिराळा न्यायालयाने पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबतच मनसेचे शिरीष पारकर यांना देखील वॉरंट बजावण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तारखेला हजर न राहिल्याने कोर्टाने हे वॉरंट बजावलं असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण… 2009 मध्ये रेल्वे आंदोलन प्रकरणी मनसेचे नेते राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी या ठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी शिराळा पोलीस (Shirala Police) ठाण्यामध्ये तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे व मनसेचे नेते शिरीष पारकर यांचा देखील समावेश होता.

सदर गुन्ह्याचा खटला हा शिराळा न्यायालयामध्ये गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान खटल्यासाठी सुनावणीला राज ठाकरे (Raj Thackeray) हे वारंवार गैरहजर राहत असल्याने चार महिन्यांपूर्वी शाळा न्यायालयाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं. मात्र, हे वॉरंट इस्लामपूर न्यायालयामधून रद्द करून घेण्यात आलं. त्यानंतर राज ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी हजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. शनिवारी शिराळा न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली.

राज ठाकरे यांची प्रकृती बरी नाही, तसेच शिरीष पारकर हे बाहेरगावी असल्याने त्यांना आजच्या सुनावणीत मुभा द्यावी, असा अर्ज वकील रवी पाटील यांच्याकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने सदरचा अर्ज नामंजूर करत राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.