पावसाळ्यात आरोग्य कसे जपावे ?

0

लोकशाही विशेष लेख

 

आयुर्वेद व पंचकर्माबद्दल बरेच गैरसमज आहेत ते दूर करून खरा आयुर्वेद तुमच्या समोर यावा म्हणून हा लेखन प्रपंच.. स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आजारी व्यक्तीच्या आजार मूळापासून दूर करण्यासाठी औषध देणे हे आयुर्वेदाचे उद्दिष्ट आहे. स्वास्थ्य रक्षणासाठी दिनचर्या, ॠतूचर्या इ. उपाय सांगितले आहेत. आपल्याकडे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद ,हेमंत आणि शिशिर असे सहा ऋतू सांगितलेले आहेत. ह्या प्रत्येक ऋतूत आपला आहार विहार कसा असावा याची पथ्यापथ्य सांगितले आहेत त्यालाच ऋतूचर्या असे म्हणतात. प्रत्येक ऋतूचर्येचे नियमित व योग्य पालन केल्यास सहसा कोणतेही आजार होत नाही विशेषतः सिझनल आजार होत नाही. प्रतिकार शक्ती वाढते.

सध्या सुरू असलेला पावसाळा म्हणजेच वर्षाऋतू बद्दल जाणून घेवू या. माझा सगळ्यात आवडता ऋतू आणि तुमच्या सगळ्यांचाही हो ना तसा पाऊस न आवडणारी (अरसिक) व्यक्ती क्वचितच असते. मनसोक्त पावसात भिजावे, डोंगरदर्यातून भटकावे, मस्त भजी वडा पाव खावे असे सगळ्यांना आवडते पण हे सगळं करताना आपल्या आरोग्याची ही काळजी घेतली पाहिजे त्यासाठी पाहुया.. वर्षाऋतूचर्या

1. ह्या काळात वातावरणातील आर्द्रता खूप वाढलेली असते त्यामुळे पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे पोटाचे विकार अपचन गॅसेस इ.लक्षणे दिसतात.

2. हा वातप्रकोपाचा काळ असतो म्हणून वाताचे आजार संधिवात इ. बाळगतात.
हे सर्व लक्षात घेता खालीलप्रमाणे आहार विहार घ्यावा.

आहार

हे खावे
आंबट खारट, स्नेहयुक्त म्हणजे तेल,गाईचे तूप वापरून केलेले पदार्थ, जुने धान्य गहू ज्वारी बाजरी तांदूळ इ, मांसरस (चिकन मटण सूप),
भाज्या, दुधी व लाल भोपळा, पडवळ, सुरण, तोंडली, फरसबी, घोसाळे, दोडका, कारले इ. गाईच्या तुपाचा वापर जेवणात भरपूर करावा, आले, लसूण,सुंठ, जिरे, धने, मेथ्या, मिरे,हिंग, लवंग, दालचिनी,ओवा, बडिशेप इ.चा मुबलक वापर करावा. हिरवे मूग, मूगाची डाळ, मसूर इ. कोशिंबीरी कमी खाव्यात. मध, हलके व गरम जेवावे. रात्रीचे जेवण हलके असावे शक्यतो घरी बनविलेले भाज्यांचे सूप्स आले मिरपूड घालून केलेली, मुगाची खिचडी, भात आमटी असे पदार्थ घ्यावेत. व रात्री लवकरच जेवावे.

हे खावू नये
कडधान्ये, पालेभाज्या (खराब सडलेल्या चिखलाने भरलेल्या) , पचायला जड असे मिठाई, सुका मेवा,मासे,मसालेदार मांसाहार,
बाहेरचे खाऊ नये, दही खावू नये.

पाणी
पाणी उकळूनच प्यावे. पाणी उकळताना त्यात सुंठ जिरे ओवा बडिशेप यांपैकी कोणतेही एक पदार्थ टाकून उकळून घ्यावे त्याचे उत्तम फायदे होतात.

विहार
दिवसा झोपणे व रात्री जागरण टाळावे, पावसात सारखे भिजू नये भिजल्यास स्वच्छ अंघोळ करून शरीर पूर्ण कोरडे करावे. ओले कपडे अंगावर ठेवू नये, अति व्यायाम अतिश्रम टाळावे, घरात धूपन करावे, डास,माश्या,किडे यापासून बचाव करावा, हिरडाचूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण +सैंधव +तूप रात्री झोपताना घ्यावे , रोज व्यवस्थित पोट साफ होईल असे पहावे. अंगाला रोज तेल लावावे. तीळ तेल किंवा आयुर्वेदिक सिद्ध तेल मसाजसाठी वापरावेत. निदान सांध्यांना तरी तेल लावावे. पण सांध्यांना सुज असेल तर तेल लावू नये.

आपल्या संस्कृतीत श्रावण महिन्यात बरेच सणवार व उपवास सांगितले आहेत (उपवास म्हणजे लंघन. साबुदाणा इ. पदार्थ खावून करतात तो उपवास नाही. उपवास केल्यास पचनशक्ती व त्या योगे प्रतिकार शक्ती सुधारते. वरील सर्व गोष्टी नीट पाळल्यास पावसाळा नक्कीच सुसह्य होईल.

डॉ. लीना बोरुडे
आयुर्वेदाचार्य पंचकर्म व वैद्यक योग तज्ञ
आंतरराष्ट्रीय योग तज्ञ
आयुष योग तज्ञ
फोन 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.