जळगाव;- ‘ कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक ‘ यांचेवतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘ कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ‘ जळगाव येथील राहुल निकम यांच्या पद्मगंधा प्रकाशन, पुणे या प्रकाशक संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘ संवर्ग ’ या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रु. रोख, स्मृतिचिन्ह, शाल असे आहे.
राहुल निकम यांचा याआधी ‘ बिजवाई ’ कथासंग्रह स्वरुप प्रकाशन, छ.संभाजीनगर यांनी प्रकाशित केलेला असून या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (म.सा.प.पुणे) यांचा माधव मदाने पुरस्कृत ‘शरच्चंद्र चिरमुले स्मृती पुरस्कार’ प्राप्त आहे. तसेच ‘अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार ’ लातूर येथिल अस्मितादर्श साहित्य संमेलनात प्राप्त आहे. ‘दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार’ दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती, तरवडी, ता.नेवासा, जि.अहमदनगर यांचेकडून मिळालेला आहे. भि.ग.रोहमारे ट्रस्ट, पोहेगाव, ता.कोपरगाव तर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामिण साहित्य पुरस्कार विभागात ‘उल्लेखनिय ग्रंथ’ म्हणून ‘बिजवाई’ कथासंग्रहाची निवड झाली आहे. तसेच सुर्योद्य सर्वसमावेश मंडळ, जळगाव यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सुर्योद्य कथा पुरस्कार प्राप्त आहे.
त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत एफ. वाय. बी. ए. वर्गाच्या वाङमयीन मराठी अभ्यासपत्रिकेत दप्तर (बिजवाई) कथेचा समावेश 2022-23 वर्षापासून करण्यात आला आहे. राहुल निकम यांच्या कथांचा हिंदी अनुवाद देखील झालेला आहे.