पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पारोळा नगरपरिषदेने हॅन्ड पंप सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांचे कडे कथन केल्या आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पारोळा नगर परिषदेचे पारोळा शहरात ३० ते ३५ हॅन्ड पंप असून, अनेक हॅन्ड पंपांना मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काळात नागरिकांनी या हॅन्ड पंपाद्वारे काही प्रमाणात पाणीटंचाई वरती मात केली असल्याची माहिती देण्यात आली. आज देखील नगरपरिषदेच्या वतीने जर हे हॅण्ड पंप दुरूस्ती केले तर शहरातील पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता येऊ शकते, अशी माहिती काही जाणकारांनी दिली.
आज पारोळा शहरांत १५ ते १६ दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. इतके दिवस पाण्याचा साठा करून ठेवणे कोणाला ही शक्य नाही. तर काही भागात सर्व सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. दर पंधरा दिवसात येणारे पिण्याचे पाणी नागरिक किती प्रमाणात साठवण करू शकतील? असा देखील मोठा प्रश्न पडतो. गेल्या काही वर्षांपूर्वी नगरपालिकेने सर्व दुरूस्ती केली होती. तेव्हा या हॅन्ड पंपाद्वारे भांडीकुंडी धुण्यासाठी पाणी, गुरांना पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध होत होते. गेल्या पाच सहा वर्षापासून नगरपरिषदेने या हॅन्ड पंप दुरूस्ती कडे दुर्लक्ष केल्यामुळे काही हँड पंप हे नादुरुस्त परिस्थिती आहेत. यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने सर्वसामान्यांची जीवाची लाही लाही होत आहे. अगदी कमी खर्चात दुरुस्त होणारी व स्वतःच्या हाताने पाणी उपलब्ध करून देणारी हॅन्ड पंप पाणी सेवा आहे. तरी याकडे पारोळा नगर परिषदेने लक्ष दिल्यास काही प्रमाणात का असेना पाण्याचा प्रश्न मार्गी लागु शकतो असे बोलले जात आहे.
या मुलभूत सुविधेकडे पारोळा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक व पाणीपुरवठा अभियंता यांनी जातीने लक्ष दिल्यास, शहरातील गुराढोरांसह वापरात येणाऱ्या पाण्याची समस्या काही प्रमाणात का असेना कमी होऊ शकते. म्हणून अनेक नागरिकांनी पारोळा नगरपरिषदेच्या मालकीचे हॅण्ड पंप दुरूस्ती करून सुरू करण्याची मागणी केली आहे.