तर मोदींचा मोठ्या फरकाने पराभव झाला असता

0

रायबरेली, लोकशाही न्युज नेटवर्क 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वाराणसीत काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केवळ दीड लाख मतांच्या फरकाने विजय झाला. यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु असताना आता राहुल गांधी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जर वाराणसीतून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली असती, तर नरेंद्र मोदी यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला असता, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील विजयानंतर काँग्रेसकडून रायबरेलीत धन्यवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. तसेच त्यांनी अयोध्येतील पराभव आणि वाराणतील निकालावरही भाष्य केलं. महत्त्वाचे म्हणजे यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभारही मानले.

“मी रायबरेलीच्या जनेतचे आभार मानतो, त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्षाला रायबरेलीत विजय मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशासह संपूर्ण भारतात एक होऊन लढला. गेल्या १० वर्षात मोदी आणि अमित शाह यांनी देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील जनतेने भाजपाच्या विरोधात मतदान केलं. देशातील जनतेने हिंसा आणि द्वेषाचं राजकारण नाकारलं आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी वाराणसीतील निकालावरही भाष्य केलं. “वाराणसीत नरेंद्र मोदींचा पराभव होता होता वाचला. जर वाराणसीतून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली असती, तर नरेंद्र मोदी वाराणसीतून दोन ते तीन लाख मतांनी पराभूत झाले असते. मी हे अहंकारातून बोलत नाही. तर मी हे म्हणतोय कारण भारताच्या पंतप्रधानांना देशातील जनतेने संदेश दिला आहे”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.