नवी दिल्ली
सरकारी कामे अनेकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितिवर अवलंबून असतात. सरकारी काम म्हणजे अतिशय दिरंगाई होणार असा मानस जनसामान्यांचा झालेला असतो. हीच बाब लक्षात घेऊन थेट केंद्राने सरकारी अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने वेळेबद्दल नियमावली जाहीर केली आहे. जर अधिकारी ९ च्या शिफ्टला ९.१५ पर्यंत पोहचू शकले नाहीत. तर सरकारी अधिकाऱ्यांचा तो दिवस हाफ डे किंवा सु्ट्टी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. याशिवाय सर्व अधिकाऱ्यांना बायोमॅट्रिक करणे गरजेचे असणार. कोविडमुळे काही अधिकाऱ्यांनी बायोमॅट्रिक सेवा वापरणे बंद केले होते त्यामुळे वेळेचे कोणतेही बंधन अधिकारी कार्यालयीन वेळेत करताना दिसत नव्हते, पण बायोमॅट्रिक सेवा पुन्हा सुरु होईल.
वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची वेळेवरुन नाराजी
मोदी सरकार सत्तेत येताच सरकारी कर्मचार्यांसाठी वेळेचे बंधन घालण्यात आले होते पण कर्मचाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. तर काही वरिष्ठ कर्मचार्यांनी कोविडनंतर आमच्या कार्यप्रणालीत बदल झाला असे म्हणत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. कामाचा अतिरिक्त ताण असतो त्यामुळे घरी किंवा सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्हाला काम करावे लागते अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी कली आहे. काही कारणास्तव जर सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहणे शक्य नसेल तर त्याची माहिती अधिकाऱ्याने आधी कळवणे बंधनकारक असेल. अतिरिक्त सुट्टी घ्यायची असेल तरी रीतसर अर्ज करुन परवानगी घेऊनच अधिकाऱ्यांना सुट्टी घेता येणार आहे.