राजकीय वाद चिघळला; आ. रवी राणांवर गुन्हा दाखल

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला.

बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी आता आमदार रवी राणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याची पार्श्वभूमी या घटनेमागे असल्याचे बोलले जात आहे. ‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता.

महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा वाद पेटला आहे. ही बाब आ. रवि राणा यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, भाजप गटनेते तुषार भारतीय आदींना लक्ष्य केले. याप्रकरणी आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीच्या हल्ल्यानंतर आता रवि राणांविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले रवी राणा

याबाबत आमदार रवी राणा यांनी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो. मीही माध्यमातून या बातम्या वाचल्या आणि पाहिल्या आहेत. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या अंगावर शाईफेक केल्याचं राणा यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्यावरील दबावामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मला काही पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. राजकीय सूडबुद्धीने मला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही आमदार राणा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एका सुईचादेखील कुठे पुरावा मिळत नाही, पण 307 चा खोटा गुन्हा दाखल केल्याचं राणा यांनी  म्हटलं आहे.

लोकसभेतही मांडला मुद्दा

लोकसभेत मंगळवारी खासदार नवनीत राणा यांनीही हाच मुद्दा मांडला. शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार परवानगी देत नाही, असा आरोप केला. दुसरीकडे हा पुतळा १९ फेब्रुवारी रोजी त्याच जागेवर पुन्हा बसविणार, असा निर्णय आमदार रवि राणा यांनी घेतला होता.

त्यासाठी आयुक्त डॉ. आष्टीकर यांना निवेदनाद्वारे पुतळा बसविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेने केली होती. यादरम्यान बुधवारी आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण घडले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

१० जणांविरुद्ध गुन्हे दाखल; पाच जण ताब्यात

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीनुसार राजापेठ पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे. यात अजय बोबडे, सूरज मिश्रा, संदीप गुल्हाने, महेश मुलचंदानी, विनोद येवतीकर यांना ताब्यात घेतले आहे.

कमलकिशोर मालाणी यांची प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहे. तीन महिला व एक पुरुष असे चार जण पसार आहेत. याप्रकरणी भादंविच्या ३०७, ३५३, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९ व आयटी ॲक्टनुसार ५०१, ५०२ अन्वये गुन्हे नोंदविले आहे.

स्क्रू ड्रायव्हरनेही हल्ला!

आमदार रवि राणा येणार असल्याचे कमलकिशोर मालानी यांनी सांगितल्यानेच तेथे गेलो होतो. या व्यक्तींनी माझ्या शासकीय वाहनांची दोन चाके स्क्रू ड्रायव्हरने फोडली व माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

चालकाने कशीतरी गाडी घरापर्यंत आणली. या धक्काबुक्कीत माझ्या शर्टाची दोन बटने तुटली. नैतिक खच्चीकरणाचा हा प्रकार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

युवा स्वाभिमान पक्षाद्वारा महिलांद्वारे आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करीत असल्याचे मनपा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी सांगितले.

अग्निशमन विभाग व सुरू असलेले आरोग्य केंद्र वगळता मुख्यालय व पाचही झोनच्या एक हजारांवर कर्मचारी मनपा गेटसमोर एकवटले व कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकदिवसाचे कामबंद आंदोलन सुरू केले.

‘शिवप्रेमीं’च्या नावे पत्रक व्हायरल

तासाभरात आयुक्तांच्या अंगावर शाई फेकत असलेले दोन व्हिडिओ व ‘आम्ही समस्त शिवप्रेमी’च्या नावाने आयुक्तांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.

यामध्ये उड्डाणपुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबाबत मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. याशिवाय राजापेठ उड्डाणपूलसुद्धा हटविल्याबाबत जाहीर निषेध करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.