पुणे :- व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून प्रभावित करण्यात आले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या मालमत्तांचे एकूण ११ बक्षीसपत्र करून घेण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि सोन्याची बिस्किटे आदी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता उकळण्यात आली. अशा प्रकारे या डॉक्टरची तब्बल पाच कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार १७ ऑक्टोबर २०१८ पासून ११ एप्रिलपर्यंत घडला.
याबाबत डॉ. अहमदअली इनामअली कुरेशी (वय-67) रा. रो हाऊस नं. 20, मेफअर एलिगंज फेज-2, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी शुक्रवारी (दि.12) कोंढवा पोलीस ठाण्यात (फिर्याद दिली आहे.
सादीक अब्दुलमजीद शेख यास्मीन सादीक शेख, एतेशाम सादीक शेख , अम्मार सादीक शेख (सर्व रा. हार्मोनी सोसायटी, गुलटेकडी), राज आढाव उर्फ नरसु यांनी फिर्यादी यांच्यसोबत वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून त्यांना प्रभावित केले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवले. तसेच वेळोवेळी फिर्यीदी यांच्या मालमत्तेचे 11 बक्षीसपत्र स्वत:च्या नावावर करुन घेतले.
तसेच फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि सोन्याचे बिस्किटे इत्यादी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उकळली. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची 5 कोटी 37 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील करीत आहेत.