बेगुसराय, लोकशाही न्यूज नेटवर्क:
बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू आहे. या अंतर्गत राज्यात कुठेही दारू पिणे किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही व्यवसाय बेकायदेशीर आहे. पण असे असतानाही हा कायदा किती प्रभावी आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. त्यामुळेच बिहारमध्ये दारू माफिया आणि तस्करांचा वावर वाढत आहे. ताजं प्रकरण बेगुसराय जिल्ह्यातील नवकोठी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. तपासादरम्यान काल रात्री येथे अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने गाडीला थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने गाडी थांबविण्याऐवजी त्याला धडक दिली, परिणामी त्याचा मृत्यू झाला.
अल्टो कारमध्ये कोणीतरी दारू घेऊन जात असल्याची माहिती नवकोठी परिसर पोलिसांना मिळाली होती. यावर कारवाई करण्यासाठी रात्री गस्तीचे वाहन पाठविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक खमास चौधरी त्यात होते. चौधरी यांनी रात्री साडेबारा वाजता छटौना बुढी गंडक नदीच्या पुलाजवळ पोलिसांची गाडी उभी केली. अल्टो कार थांबवण्यासाठी ते रस्त्यावर उभे राहिले. त्यांच्यासोबत तीन होमगार्ड शिपाईही होते.
अल्टो कारच्या चालकाने पोलिसांचे वाहन पाहून गाडीचा वेग वाढवून खमास चौधरी यांना धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले आणि दगडावर आपटल्यामुळे डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा होमगार्ड जवानही जखमी झाला आहे. त्यांच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ बखरी, नवकोठी पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अल्टो कारच्या मालकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.