कवी मनोहर आंधळे यांच्या गीतातून होतेय मतदान जनजागृती (व्हिडीओ)

लोकशाही माध्यम समूहाची निर्मिती ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

0

चाळीसगाव, जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी पुढे यावे. लोकशाहीचा हा सन्मान वाढावा. याकरीता चाळीसगाव उपविभागीय प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी चाळीसगाव तालुक्यातील लोकनेते काकासाहेब जी. जी. चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा करगाव येथे पर्यवेक्षक पदी कार्यरत असलेले कवी मनोहर आंधळे यांना उपरोक्त गीत लेखन करण्याचे निमंत्रण दिले.

ते निमंत्रण स्वीकारून कवी मनोहर आंधळे यांनी “लोकशाहीचा, देशहिताचा पाया कणखर करू चला… हक्क आपुला मतदानाचा, धागा पक्का करू चला… चला, चला… चला, चला… चलाहो मतदान करू चला” अशा आशयाचे गीत लिहिले आहे. सदर गीतास म. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही पसंती दर्शवून… नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांच्या सुमधूर आवाजात हे गीत ध्वनिमुद्रित केले गेले आहे.

नक्कीच या गीताद्वारे सर्व मतदारांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल; आणि जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढेल. अशी आशा चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी व्यक्त करून कवी/गीतकार मनोहर आंधळे यांच्या गीत लेखनाचे कौतुक करत धन्यवाद दिले आहेत.

यापूर्वीही कवी शिक्षक मनोहर आंधळे यांनी बावीस वर्षांपूर्वी प्रौढशिक्षण प्रचार व प्रसार होणेकामी पथनाट्य लेखन, दिग्दर्शन व प्रत्यक्ष सहभाग देत. चाळीसगाव शहर व तालुक्यात ठिकठिकाणी साक्षरता आणि सर्वधर्म समभावपर पथनाट्य सादर करून आणि गीत गायनातून जनजागृतीचे कार्य केलेले आहे.

उपरोक्त मतदान जनजागृतीपर गीत लेखनाबद्दल चाळीसगाव येथील तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, संदेश निकुंभ व विकास लाडवंजारी यांचेसह तालुका गटसाधन केंद्राचे शिक्षणाधिकारी विलास भोई, शिक्षणविस्तार अधिकारी जितेंद्र महाजन यांनी कवी आंधळेंचे अभिनंदन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.