मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रपूर येथील सभेत उद्धव ठाकरेंचा पक्ष बनावट शिवसेना असल्याची घणाघाती टीका केली. त्यावर उद्धव ठाकरेंनी मविआच्या एकत्र पत्रकार परिषदेत भाजप व पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटल्याचा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र उपसले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे. मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला शंभर कोटी वसुलीची सुरूवात कोणी केली होती? याचे आधी उबाठा यांनी उत्तर द्यावे’. पुढे त्यांनी लिहिले आहे की, ‘खरे तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केले. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत.
जनता धडा शिकविणार !
तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावे 2014, 2019 प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि 4 जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचे आवडते काम करावे लागेल. अब की बार 400 पार’, असे जोरदार प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.