पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

२६ जुलै, “कारगिल विजय दिवस”  हा समस्त भारतीयांसाठी अतिशय अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी भारतीय सैनिकानी कारगिल युद्धात पाकिस्तानच्या विरोधात अदम्य साहसाचा परिचय देत विजय मिळवला होता. या प्रसंगाचे औचीत्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे कारगील युद्धात प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या हौतात्म्यास आदरांजली वाहिली. तसेच विजयोत्सव देखील साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन कु. जिज्ञासा कुमत व कु.कार्तिक पाटील या विद्यार्थ्यांनी केली. शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी प्रतीकात्मक अमर जवान ज्योती स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले व सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी ८ वी तील विद्यार्थिनींनी ‘मेरी मिट्टी के जवानो…,ए मेरे वतन… वंदे मातरम.. या देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य सादर केले. तर दुसऱ्या समूहाने हिंदोस्ता हमारा है..,ये देश है वीर जवानो का. या गाण्यातून देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. भारतीय सीमारेषा पाकिस्तानच्या घुसखोरी कारवायांच्या विरोधातील ऑपरेशन विजय, कारगिल युद्ध तसेच कारगिल विजय दिवस या प्रसंगाचे हुबेहूब चित्र विद्यार्थ्यांनी नाटकीय रुपात सादर केले. कु.सोहम पाटील याने कारगिल युद्धाची थरारक माहिती देवून भारतीय सैनिकांची शौर्यगाथा कथन केली. एका लघु नाटिकेतून सामान्य नागरिक आणि कारगिल युद्धातील सैनिक यांचे संभाषण प्रस्तुत केले. दरम्यान कु.पलक काबरा हिने आपल्या कवितेतून देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिमला कराराचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर देत भारतीय वीर जवानांनी विजय मिळविला. कॅप्टन विक्रम बत्रा यांचे कारगिल मोहिमेतील दुर्दम्य साहस व वीरमरण या कार्याला सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. तसेच भारतमातेच्या वीर जवानांचा आपण सन्मान केला पाहिजे. असा आग्रह धरला. भारत माता की जय. या घोषणेने परिसर दुमदुमला. विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ठ सदरीकरणासाठी त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.