पिंपरी : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई करत एका हॉटेल कामगाराला अटक केली होती. याच प्रकरणात आता एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक झाली आहे. त्याच्याकडून सुमारे ४५ कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षकाला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
विकास शेळके (नेमणूक-निगडी पोलीस ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ दरभंगा, रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालनगर परिसरात शुक्रवारी पहाटे एक जण संशयितरीत्या फिरताना निदर्शनास आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून चौकशी केली. चौकशीत त्याच्याकडील दोन किलो मेफेड्रोन ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात एकूण ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे ४४ किलो ७९० रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याला
न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नमामी झा याच्याकडे पुढे केलेल्या चौकशीत या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी शेळके याला अटक केली आहे. तसेच, न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सचिन कदम, पोलीस हवालदार मोरे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
केली.