पेणमध्ये बनावट मृत्युपत्र बनवून फसवणुक; निवासी सदनिका आणि व्यापारी गाळा हडपण्यासाठी रचला कट !

मुद्रांक विक्रेता हबीब खोत यास अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पेण एस टी डिपो समोरील “कस्तुरी प्लाझा” या इमारतीमधील निवासी सदनिका आणि व्यापारी गाळ्याचे बनावट मृत्युपत्र बनवून त्या मृत्युपत्रामध्ये बेकायदेरित्या तीन नावे वाढवून, ती सदनिक आणि व्यापारी गाळा हडप करण्यासाठी कट रचल्याच्या प्रकरणात पेण येथील मुद्रांक विक्रेता हबीब खोत याला पेण पोलिसांनी काल अटक केली.

या बाबत सविस्तर वृत्त असे, पेण येथील फिर्यादी पुनम शंभुनाथ गुप्ता यांच्या आईच्या मालकी हक्कात असलेल्या निवासी सदनिका आणि व्यापारी गाळा याचे मृत्युपूर्वी मृत्युपत्र बनविले होते. मात्र पूनम यांची आई प्रभावती शंभुनाथ गुप्ता यांच्या मृत्यु पश्चात प्रभावती यांची विभक्त सून आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी गीता सुशील गुप्ता रा. टिटवाळा- कल्याण हिने अंधेरी येथील वकील जनार्दन रावजी मोरे आणि पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांच्या मदतीने दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी बनावट मृत्युपत्र बनवून गीता गुप्ता हिने तिचे व तिच्या दोन मुलींची नावे बनावट मृत्युपत्रात वाढविली. फिर्यादी पूनम या शारीरीक दृष्ट्या ८५ टक्के दिव्यांग आहे.

पूनम यांच्या आईच्या मृत्युपश्चात उपरोक्त मिळकतीवर पूनम व भाऊ अनिलकुमार गुप्ता याचे नाव लावण्यासाठी त्यांनी दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी रितसर अर्ज नगरपरिषद पेण येथे केला. तेव्हा बनावट मृत्यूपत्राचे प्रकरण उजेडात आल्याचे फिर्यादी पूनम गुप्ता यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गीता गुप्ता यांना या प्रकरणांमध्ये अटक झाली होती व सध्या जामिनावर बाहेर आहे. पोलिसांनी गीता गुप्ता यांची सखोल चौकशी केल्यावर त्यांनी पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांनी या कामी मदत केल्याचे उघड केले. गीता गुप्ता यांनी दिलेल्या जबाबा वरून पेण पोलिसांनी काल हबीब खोत याला अटक करून बनावट कागदपत्र व फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या या प्रकरणात पुढील तपास पेण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहिते हे करत आहेत.

जीवन पाटील – मुख्याधिकारी पेण नगरपरिषद
सदरील गुप्ता प्रकरणात पेण नगरपरिषदेकडे दोन मृत्युपत्र आले होते. मात्र हीबाब नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना कळविले नाही. याबाबत सदरील कर्मचाऱ्यावर एक अधिकारी नेमून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमध्ये तो कर्मचारी दोशी आढळल्यास त्याच्यावर पेण नगरपरिषद मार्फत कारवाई केली जाईल. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मृत्युपत्र खरे व खोटे कोणते हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. त्यामुळे मृत्युपत्राबाबत आम्ही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.