पाचोर्‍यात घरफोडी; हजारोंचे रोकड व दागिने लंपास

0

पाचोरा;- शहरातील डाक बंगला जवळ असणाऱ्या कृष्णाजी नगर मधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाज्याचे कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील अंदाजे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याचा प्रकार 12 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला.  याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कृष्णाजी नगर येथे राहणारे नितीन संतोष पाटील यांच्या घराच्या मागील दरवाज्याचे चॅनल गेट व दरवाजाची कडी कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने बेडरूम मधील लाकडी कपाटातील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला . तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गुलाब हरी पाटील व दत्तात्रय सिताराम पाटील रा. कृष्णाजी नगर यांच्या घराच्या खिडक्यांचे ग्रील तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार 11 ऑगस्ट रोजी च्या रात्री साडेअकरा ते १२ ऑगस्ट रोजीच्या सकाळी ५ वाजे दरम्यान घडला.याबाबत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बापूराव वामन पाटील वय 67 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गनगे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.