विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या नियमावलीला मान्यता

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये संशोधन अधिक वाढीला लागावे म्हणून कुलगुरू विद्यार्थी संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत पूर्णवेळ संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या नियमावलीला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या कल्पनेतुन ही पारितोषिक योजना आकाराला आली आहे. गुरूवार दि. १८ जानेवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मान्यता देण्यात आली. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. एस. आर. कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्यावर चर्चा होवून या समितीने तयार केलेल्या प्रारूपाला मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे विद्यापीठ प्रशाळांमधील संशोधन अधिक वाढीला लागेल अशी भावना व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या कालावधीत विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधन होवू शकले नाही. तसेच संशोधनासाठी विविध वित्तीय संस्थाकडून प्राप्त होणारा निधी देखील कमी झाल्यामुळे संशोधनात घट झाली होती. विद्यापीठात परिसरातील विविध प्रशाळांमध्ये पूर्णवेळ संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रवृत्त केले जावे म्हणून ही योजना सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आली होती व त्यासाठी २० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

संशोधक विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन पेपर प्रसिध्द झाल्यास प्रोत्साहनपर ५ हजार रूपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय पेटंट पब्लिकेशनसाठी २ हजार आणि पेटंट अनुदान पुरस्कार म्हणून ५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत शोधनिबंध व पेटंट पब्लिकेशन प्रकाशित झालेले असावेत अशी अट घालण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीला प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राजेंद्र नन्नवरे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, अधिष्ठाता प्रा. एस. टी. भुकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. संदीप पाटील, प्रा. पवित्रा पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.