शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंस्कृतीची पंढरी असलेल्या संपूर्ण राज्यात जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने व्यापक स्वरुपात साजरे करणार आहे. या संमेलनाच्या महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत व नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दि. १४ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. या महोत्सवात सर्व कलावंतांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रावर होणाऱ्या या नाट्यकलेचा जागर अंतर्गत जळगाव जिल्ह्यातदेखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे एकांकिका स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यात होणार आहे.

१४ जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरु होवून यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यशाळेत नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेनंतर अंतिम फेरीतील संघांच्या सादरीकरणाचा दर्जा सर्वोत्तम असणार आहे.

व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व हौशी गुणवंत कलावंतांना शतक महोत्सवी नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागर महोत्सवातून मिळणार आहे.  या स्पर्धात एकांकिका स्पर्धेत खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट रु. दोन लाख अथवा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ एकांकिकेस रु.एक लाख, उत्कृष्ठ एकांकिकेस रु.७५ हजार, उत्तम एकांकिकेस रु.५० हजार व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रु.२५ हजार देण्यात येणार आहे. बालनाट्य स्पर्धेतील बालनाट्यांना सर्वोत्कृष्ट रु.७५ हजार, उत्कृष्ट रु.५० हजार, उत्तम रु.२५ हजार तर तीन उत्तेजनार्थ रु.१० हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

नाट्य अभिवाचन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.२५ हजार, उत्कृष्ट रु.१५ हजार, उत्तम रु.१० हजार व दोन उत्तेजनार्थ रु.५ हजार आणि नाट्यसंगीत पद गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.२५ हजार, उत्कृष्ट रु.१५ हजार, उत्तम रु.१० हजार व दोन उत्तेजनार्थ रु.५ हजार पारितोषिके देण्यात येणार आहे. एकपात्री/नाट्यछटा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.१५ हजार, उत्कृष्ट रु.१० हजार, उत्तम रु.५ हजार, दोन उत्तेजनार्थ रु.अडीच हजार या पारितोषिकांसोबतच एकांकिका व बालनाट्य स्पर्धेसाठी लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, स्त्री अभिनय, पुरुष अभिनयाची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश फी रु.१ हजार व बालनाट्यासाठी रु.५०० व इतर स्पर्धांसाठी रु.१०० राहणार आहे. ही प्रवेश फी व प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावयाचे असून, त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे. प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ आहे.

नाट्यकलेचा जागर या स्पर्धा महोत्सवात जळगाव केंद्रासाठी केंद्रप्रमुख योगेश शुक्ल (९६५७७०१७९२), सहयोगी प्रमुख ॲड.संजय राणे, शरद पांडे,  प्रा.शमा सराफ, पद्मनाभ देशपांडे (99231 38006), चिंतामण पाटील (8275709465), संदीप घोरपडे (94222 79710), प्रा. प्रसाद देसाई (9371688861), प्रा.स्वप्ना लिंबेकर – भट (7030545342) यांचेशी संपर्क करावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी नाट्यसंस्था, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, नाट्यजागर विभाग प्रमुख शिवाजी शिंदे,  मध्यवर्ती शाखा सदस्य गितांजली ठाकरे आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.