मी नाराज नाही; स्मिता वाघ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू – खा. उन्मेष पाटील

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भाजपने मला एक कार्यकर्ता ते आमदार, खासदार बनवले. आमदार, खासदार पदे जीवनाचे अंतीम साध्य नसून समाजाच्या प्रगतीसाठी ती साधने आहेत. याच माध्यमातून मला मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे करता आली. त्यामुळे मला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षावर नाराज होण्याचे काही कारणच नाही. मला उमेदवारी मिळाली नसली तरी कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीत जळगांव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे जिल्हाभरात चर्चा होत आहेत. दरम्यान खा. उन्मेष पाटील याविषयी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पार्श्वीभूमीवर त्यांनी चाळीसगाव येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेवून आपण नाराज नसून पक्ष जी जबाबदारी देईल ती पाळू व एक कार्यकर्ता म्हणून काम करू आणि स्मिता वाघ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू असे सांगितले.

खा. पाटील म्हणाले की, माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आमदारकीचे तिकीट दिले. पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. जनतेचे आशिर्वाद मिळाल्याने तीस वर्षापासून प्रलंबीत असलेले अनेक प्रश्न मार्गी लावले. आमदार, खासदार म्हणून काम करताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी प्रयत्न केले, चाळीसगाव नगरपालिकेवर पक्षाचा झेंडा रोवला, पंचायत समिती, बाजार कमिटी ताब्यात घेतली, गिरणा परिक्रमा करून सिंचनाचे प्रश्न सोडवण्याचे काम केले.बलून बंधारे, वरखेडे लोंढे बॅरेज, केकी मूस कला दालन, ट्रामा केअर सेंटर, तितूर डोंगरी नदीवरील सिचंन प्रकल्प ही कामे करता आली. अमृत योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी आणला. मोठमोठे उद्योग जिल्ह्यात आणले. तोडाफोडा असे राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य दिले. चाळीसगाव तालुक्यात केलेल्या कामांमुळे जळगाव लोकसभा मतदार संघात पक्षाने इच्छा नसतांना देखील लोकसभा निवडणुक लढविण्याचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी निवडणुक लढवली आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्क्याने विजयी झालो. खासदार या नात्याने मोठी जबाबदारी मिळाली. सदसदविवेकबुद्धीने काम केले, द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. दुसऱ्याची लाईन छोटी करण्यापेक्षा आपली लाईन कशी वाढवता येईल याकरिता आपण काम केले. पंतप्रधान मोदींच्या विकासाचा धागा होण्याचे काम केले. जिल्ह्यात सर्वात जास्त योजना राबवण्याचे भाग्य मला मिळाल असे ते म्हणाले.

देशात टॉप टेन व कामगिरी टॉप सेवन असताना आपले तिकीट कट झाले या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, हा वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे. कोणी काय केले यापेक्षा त्यांनी मला आमदार-खासदार केले, जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली. नेत्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. स्मिताताई वाघ यांना उमेदवारी मिळाली, उशिरा का होईना त्यांना न्याय मिळाला. पाच वर्षांपूर्वी त्या खासदार झाल्या असत्या. या निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त लीड कसा आणता येईल असा प्रयत्न करेल असे ते म्हणाले.

आपणास दुसऱ्या पक्षाकडून काही ऑफर आली आहे का असा प्रशन विचारला असता, यावर मी कुठेही जाणार नाही, मी एकनिष्ठ आहे हे सर्वाना माहित आहे. त्यामुळे माझ्यापर्यंत कोणी येणार नाही. पक्षाचा जो आदेश असेल त्याप्रमाणे एक कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार आहे. पक्ष योग्यवेळी योग्य संधी देईल असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख घृष्णेश्वर पाटील, वसंत चंद्रात्रे, के. बी साळुंखे, सुनील पाटील, दिनेश बोरसे, पदमाकर पाटील, रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.