गाडी….तुतारी अन्‌ खडेबोल !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा जोरात सुरु झाला आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करुन आपल्याच हाताने धोंडा मारुन घेतला आहे. प्रत्यक्ष मतदानाला अजून दीड महिन्यांचा अवधी हाती असतांनाही उमेदवारी जाहीर करण्याची घाई  भाजपला संकटात घेवून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जळगावात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापून भाजपाने धक्का दिला असला तरी विद्यमान खासदारही आपली खेळी खेळण्यात मग्न झालेले आहेत. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात पुन्हा रक्षाताई खडसे यांना उमेदवारी देवून भाजपाने त्यांना संधी दिली असली तरी श्रीमती खडसे यांच्या उमेदवारीत खोडा घालण्यासाठी पदाधिकारीच पुढाकार घेत आहेत. भाजपाच्या एका बैठकीचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये आल्यानंतर पक्ष श्रेष्ठीही अवाक्‌ झाले आहेत.

रक्षा खडसे यांचे श्वसूर एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर खडसे कुटुंब आणि भाजपात सख्य राहिले नसले तरी रक्षा खडसे यांना खासदारकीमुळे भाजपात राहणे क्रमप्राप्त आहे. आज तर श्रीमती रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्या पुन्हा भाजप परिवरात सक्रिय झाल्या असल्या तरी परिवारातूनच त्यांना थेट विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. काल-परवापर्यंत छुप्या पद्धतीने होणारा हा विरोध आता समोरासमोर होवू लागल्याने   दिल्लीवारीची ‘वाट’ बिकट होत आहे. समाजमाध्यमांमध्ये आलेला व्हिडीओ अतिशय बोलका असून एक निष्ठावंत कार्यकर्ता पक्षश्रेष्ठठींसमोर रक्षा खडसे यांना चांगलेच  खडेबोल सुनावित आहे. रक्षा खडसे या कार्यकर्त्यांला थांबविण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी त्याचा उपयोग होतांना दिसत नाही.

खासदार भाजपाच्या असतांनाही त्यांच्या वाहनात तुतारी (राष्ट्रवादी)चे कार्यकर्ते सातत्याने प्रवास करीत असून भाजप कार्यकर्त्यांचे काम होत नाही. कधीही भाजपाचे व्हिजन तन-मन-धनाने त्या पुढे रेटत नसल्याची ओरड मध्यंतरी वाढली आहे. मतदारसंघात विकासाची कामे झाली असली तरी त्याची प्रसिद्धी करण्यात श्रीमती खडसे या मागे राहिल्या आहेत. भाजप पदाधिकाऱ्याने एखादे काम सांगितले तरी ‘हो करते’ असेच उत्तर मिळते. प्रत्यक्षात ‘काम’ होते की नाही हा प्रश्नच कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत भेडसावत राहतो. कार्यकर्त्यांच्या बळावरच नेत्याची लोकप्रियता आणि उमेदवारी ठरत असते मात्र काही नेते क्षणात गगनाला गवसनी घालत असल्याने त्यांना असे खडेबोल सुनाविले जातात. मुळात रक्षा खडसे यांनी विकास कामात आघाडी घेतली असतांनाही..  त्यांना तिसऱ्यांचा उमेदवारी मिळाली असतानाही….. नेत्यांची फळी पाठी उभी असतांनाही….. अशा कार्यकर्त्यांचा सामना का करावा लागत आहे?

रक्षाताईंची गाडी…. तुतारीचे कार्यकर्ते असे समीकरण होत असले तर भाजप कार्यकर्त्यांचा संताप होणे स्वाभाविकच आहे. जीवाचे रान करुन कार्यकर्ते ‘आगे बढो’चा नारा देत असतांनाही त्यांच्याकडे पदाधिकाऱ्याने दुर्लक्ष करणे योग्य होत नाही. असेच काहीसे रक्षाताईंच्या बाबतीत झाले असून तुतारीच्या निनादाने त्यांना भाजप कार्यकर्त्यांचा आवाज पोहचला नसल्याने हे ‘खडेबोल’ खावे लागले. शेवटी काय तर कार्यकर्तेही मोदी भक्त असल्याने ते ‘मन की बात’ करतीलच !

Leave A Reply

Your email address will not be published.