क्रूर आईने केले मुलाचे शीर धडावेगळे; पोलीस तपासात आले धक्कादायक कारण समोर…

0

 

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कव्हे येथे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सहा वर्षीय चिमुरड्याचा खून करून चिमुरड्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मुलाच्या आईवरील उपचार पूर्ण होताच पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी मिळाली. यावेळी तपासात पोलिसांना भयानक वास्तव समोर आले. आईचे माहेरातील प्रेमप्रकरण सासरी समजेल आणि पुढे मुलालाही त्रास होईल या भीतीने चिमुरड्याचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे तपासात उघड झाले. प्रणव गणेश चोपडे (६) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव असून, त्याचे आजोबा नारायण चोपडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. याप्रकरणी मुलाची आई आरोपी कौशल्या गणेश चोपडे हिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरातील प्रेम प्रकरण सासरच्यांना कळेल या भितीने ती आत्महत्येच्या विचारात होती. सन २०२२ मध्येही तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला होता. मात्र कुटुंबाने खासगी डॉक्टरांकडून उपचार करून गोळ्या सुरू ठेवल्या होत्या. त्याचबरोबर पती-पत्नींमध्येही काही कारणास्तव भांडणे होत होती.

दरम्यान घटनेच्या दिवशी प्रथमत: तिने ‘टीव्ही पाहतो काय?’ म्हणत आपल्या मुलाचा गळा आवळला. नंतर तो मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले. परंतु आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर ? असा विचार करून गळा आवळल्यानंतर तिने कुऱ्हाडीने त्याचे शीर धडावेगळे केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यानंतर तिने स्वतःही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यामुळे तिने लागलीच दीड ग्लास तणनाशक औषधाचे प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे सगळ पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.