चिंताजनक.. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचा धोका; केंद्राने दिले ‘हे’ आदेश

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला तरी एका नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. परदेशात मंकीपॉक्स या नवीन विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे आता केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे.

केंद्र सरकारने शुक्रवार 20 मे रोजी विमानतळ अशा सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंटवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केल्यानंतर भारतात आलेल्या प्रवाशांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठवले जातील.

केंद्राने दिलेली महत्वाचे आदेश

परदेशात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढल्याने केंद्र सरकार सतर्क झाले असून केंद्राने काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. जेथे लोक विशिष्ट लक्षणे दर्शवतात अशा प्रकरणांमध्येच नमुने (एनआयव्ही, पुणे) पाठवा. आजारी प्रवाशांचे नमुने पाठवले जाणार नाहीत. अशा सूचना देण्यात आलाय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्राने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांना युरोप आणि इतरत्र आढळलेल्या मंकीपॉक्स प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

मंकीपॉक्सचा संसर्ग

मंकीपॉक्स आफ्रिकेपर्यंत मर्यादित असलेला विषाणूजन्य रोग, आता युरोपमध्ये कहर करत आहे. स्पेनमध्ये गुरुवारी 19 मे रोजी सात प्रकरणांची पुष्टी झाली, तर पोर्तुगालची संख्या 14 वर पोहोचली. स्पेनमध्ये आतापर्यंत नोंदलेली सर्व प्रकरणे राजधानी माद्रिदमधील आहेत आणि सर्व संक्रमित पुरुष आहेत. मंकीपॉक्सचा संसर्ग अगदी जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. तसेच, मंकीपॉक्सचा धोका असलेल्या व्यक्तीने वापरलेले कपडे किंवा चादरी वापरून संसर्ग पसरू शकतो.

मंकीपॉक्स दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग

मंकीपॉक्स हा मानवी स्मॉलपॉक्ससारखाच दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवण्यात आलेल्या माकडांमध्ये हे पहिल्यांदा आढळून आले. मंकीपॉक्सच्या संसर्गाची पहिली घटना 1970 मध्ये नोंदवली गेली. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागात होतो आणि अधूनमधून उर्वरित प्रदेशात पोहोचतो.

मंकीपॉक्सची लक्षणे

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, मंकीपॉक्समध्ये सहसा ताप, पुरळ आणि गाठी येतात आणि त्यामुळे विविध वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते. लक्षणे सहसा दोन ते चार आठवड्यांपर्यंत दिसतात, जी स्वतःच निघून जातात. प्रकरणे गंभीर देखील असू शकतात. अलीकडच्या काळात, मृत्यूचे प्रमाण सुमारे 3-6 टक्के आहे, परंतु ते 10 टक्क्यांपर्यंत जास्त असू शकते. संसर्गाच्या सध्याच्या प्रसारादरम्यान मृत्यूचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.