खडसेंची मानसिकता ठीक आहे का? आ. चंद्रकांत पाटलांचा पलटवार

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माझा भाचा उज्वल बोरसे याने नवे बोरखेडा -उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला असून हा रस्ता तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांना मंजूर होता, मग नऊ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला कसा ? असा पलटवार केला. तसेच माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांची मानसिकता ठिकाणावर आहे का?  असा प्रति प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने नऊ कोटी रुपये कामे न करता बीले काढल्याचा आरोप केलेला होता. यावर आमदार पाटील यांनीपत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

सदर कामाची संयुक्त चौकशी समितीने सखोल चौकशी केलेली असून त्या संदर्भात अहवाल देखील सादर केलेला आहे आणि सदर रस्ता सुस्थितीत, रहदारीस योग्य असल्याचे म्हटलेले असताना खडसे यांचा आरोप केवळ माझ्या भाच्याची बदनामी करण्याचा प्रकार आहे. सदर खोट्या आरोपाला उत्तर देणे संयुक्तिक वाटत नसले तरी वस्तूस्थिती जनतेसमोर येण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसे यांनी आपल्यावर पाच कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले की, हो मी निधी परत पाठवला आहे, परंतु त्यापैकी अडीच कोटी रुपयांचा निधी केवळ खडसे यांच्या शैक्षणिक संस्था व मंगल कार्यालयाच्या उपयोगासाठी आणण्यात आलेला होता. त्यामध्ये 690 गट नंबर मध्ये पेवर ब्लॉक बसवणे 15 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथील सायन्स कॉलेज नजीक 1000 मीटर रस्त्याचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे 25 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे विज्ञान कॉलेज नजीक व्यायाम शाळा बांधकाम करणे 35 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे गट नंबर 699 मध्ये मल्टीपर्पज हॉल बांधकाम करणे 50 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे मंगल कार्यालय नजीक पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये, पुनर्वसन टप्पा क्रमांक तीन मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे 20 लक्ष रुपये आणि गट नंबर 120 च्या एक मध्ये विद्यालयानजीक मल्टीपर्पज हॉल बांधणे पन्नास लक्ष रुपये, हे जवळपास अडीच कोटी रुपयांची कामे खडसे यांच्या वैयक्तिक संस्थेच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार होते.

यामध्ये गोदावरी मंगल कार्यालयाचा देखील उल्लेख करत मंगल कार्यालयाचे बांधकाम खासदार व आमदार निधीतून करण्यात आला असून या मंगल कार्यालयातून वर्षभर येणारे भाडे तत्वावरील उत्पन्न हे स्वतःच्या खिशात खडसे घालत असून हा खरा भ्रष्टाचार आहे असा आरोप त्यांनी याप्रसंगी केला. प्रत्यक्ष सामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार झाला म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमागे महापुरुषांच्या पूजन प्रसंगी चप्पल घालून ते गेल्याने त्यावर वाद होऊ नये म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर व माझ्या भाच्यावर आरोप केलेला आहे.

आदिशक्ती मुक्ताईच्या दान पेट्यांचा पैसा कुठे जातो ? संत निवासाचा उपयोग कुणासाठी केला जातो ? तुमचा भाचा कोणत्या प्रकरणात अडकलेला आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माझ्या आमंत्रणावरून दुसऱ्यांदा येत आहेत हे त्यांना पचनी पडत नसून त्या असून आसुये पोटी ते आरोप करत आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांपासून अनेक धरणांची कामे अपूर्ण व संथ गतीने निधी मिळाला नसल्याचे खडसे म्हणतात, मग तीन वर्ष जलसंपदा मंत्री आणि अर्थ मंत्री हे तुमचे  होते, त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही, की निधी आणण्यासाठी तुम्ही कमी पडले ? असा परखड सवाल देखील त्यांनी याप्रसंगी केला.

स्वतःच्या घरात आमदारकी- खासदारकी एवढे असताना परत तुम्हाला स्वतःच्या कुटुंबात आमदारकी मिळावी यासाठी तुमचा खटाटोप सुरू त्या ऐवजी खडसे यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली असती तर त्यांचा मोठेपणा सिद्ध झाला असता असा खोचक टोला देखील त्यांनी याप्रसंगी दिला.

जनसंवाद यात्रा काढणे संदर्भात टीका करताना त्यांनी तीस वर्षे तुम्हीच आमदार होते मंत्री होते विरोधी पक्षनेते अर्थातच मुख्यमंत्री पदाच्या बरोबरीचे पद तुमच्याकडे होते, मग जनसंवाद यात्रा काढून तुम्ही तीस वर्षात काय केले हे सांगा ? असा दमदार टोला त्यांनी या यात्रेवरून लगावला.

जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये खडसे यांनी  मात्र चकार शब्दाने देखील त्यांनी  बकाले याचा निषेध केला नाही, हा तुमचा बगलबच्चा तर नव्हे  ना ? असा आरोप करत द्वेष भावनेतून तुमची विशिष्ट समाजासंदर्भात मानसिकता काय ? हे दिसून येत असल्याचा आरोप देखील आमदार पाटील यांनी याप्रसंगी खडसे यांच्यावर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.