कर्माला तोडण्यासाठी आत्मपुरुषार्थ प्रबळ असावा..

0

प्रवचन सारांश- 18.09.2022

कर्माला तोडायचे असेल तर आत्मपुरुषार्थ प्रबळ असायला हवा. चांगल्या कार्यासाठीचे आपण निमित्त बनावे असे मोलाचे चिंतन प्रवचन प्रभावक डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आजच्या प्रवचनात केले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पूज्य पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा ७ यांचा चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

‘जीवन बहता पानी, नही पलभर रुक सकता..’ भजन काव्याने या प्रवचनाची सुरुवात झाली. कुणी कुणाचे बरे किंवा वाईट करू शकत नाही हे सतत लक्षात ठेवा. वाईटाचे निमित्त आपण बनू नये; मात्र चांगल्या कार्यासाठी आपण निमित्त बनावे त्याबाबत विवेक ठेवावा, निमित्ताच्या कारणामुळे अहंकार येतो व अहंकार आला की पतन सुरू होते. माझ्या पुण्य प्रभामध्ये वाढ कशी होईल ? या बद्दल चिंतन करायला हवे. प्रामाणिकपणा मोजायचा थर्मामीटर व्यक्ती, परिस्थिती सापेक्ष असतो. याबाबत त्यांनी प्रवचनात रूपक कथा सांगितली.

एका नगरीत शेठजी असतात, नोकरांच्या भरवशावर ते आपला व्यवहार करत असतात. नोकर प्रामाणिक असले तरी स्वार्थ आला की  बेईमानी आलीच म्हणून  समजा. त्यांचे कर्म उदय झाले, परिस्थिती बिकट झाली. ते खूप गरीब झाले, इतके गरीब झाले  की घरातील भांडी-कुंडी, पत्नीचे दागिने ही विकावे लागते. त्या नगरीत गुरु भगवंत आलेले असतात. त्यांच्या दर्शन, वंदना केल्यावर  शेठजींनी आपले दुखणे,  बेतलेली परिस्थिती मोकळेपणाने सांगितले. त्यावरून गुरू- भगवंतांनी शेठ यांनी नियमित ‘सामायिक’ करावी असे सांगितले. दृढ विश्वासाने रोज एक सामायिक करण्याचा संकल्पही त्यांनी केला. त्यामुळे त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभले. चिंता-विवंचना मिटल्या. त्यासोबत पत्नीने या परिस्थितीतून निघण्यासाठी काही तरी करा असे सांगितले. शेठनी चिंतन केले. आपल्याकडे धन होते पण हातून दान-धर्म केले नाही हे शल्य त्यांना बोचू लागले. शेठजी यांनी 20 वर्षापूर्वी केलेला व लिहुन ठेवलेला व्यवहार शोधला. चोपडी-वहीत पाहिले की शेजारच्या गावातील एका जाटला १ हजार चांदीची रोकड दिली आहे. ते वसूल करावे म्हणून शेठ निघाले. ब्रह्ममुहूर्तावर उठून शेठ ५ कोस चालून गेले. शेठाणीने सोबत चुरम्याचे लाडू दिले होते.

सकाळीच  जाटने शेठला पाहिले, ओळखले. वीस वर्षापूर्वी तुम्हाला रोकड 1 हजार चांदीचे रुपये दिले ते मला व्याजासह परत कर असे सांगून आपले पैसे मागितले. जाटची नियत फिरली, म्हणाला, ‘मी तुमच्या कडून पैसे घेतले हे बोलू नको, चूपचाप निघून जा..’ असे कटू शब्द शेठला ऐकावे लागले. मी कुणाला असे कटू शब्द बोललो का? ह्यावर चिंतन केले आणि तिथेच सामायिक करायला बसले.

सामायिक झाली तोवर चमत्कार झाला. जाटच्या एकुलत्या एक नातवाची तब्येत बिघडली. शेठच्या करणीने हे घडले होते असे जाटच्या पत्नीने समज केला. जाटला घरी बोलावले व 20 वर्षा पूर्वी घेतलेले शेठचे पैसे परत करा नाहीतर मी घरातले सगळे शेठला देईन असे सांगितले. परतफेड करणे म्हणजे रोकड, व्याज सगळं मिळून मोठी रक्कम झाली होती. देणेकरी जाट कफल्लक झाला असता. आपण न्यायनीतीने वागले पाहिजे मला तुम्हा पंचावर विश्वास आहे असे शेठ म्हणाले. रोकड रक्कम, व्याज व ५० गाडया वस्तू घ्याव्या असा पंचांनी निर्णय दिला. शेठची पत्नी साहित्यासह शेठजींना बघते व विचारते की हा काय प्रकार आहे ? त्यावर शेठ म्हणतात, हा सगळा माल आपला आहे. घडलेली परिस्थिती शेठजींनी सांगितली. मी सामायिक विसरलो होतो. माझी चूक लक्षात आली. कर्माला तोडण्यासाठी पुरुषार्थ प्रबळ असावा, असे डॉ. पदमचंद्र मुनी यांनी रविवारच्या खास प्रवचनात ‘कर्म आणि पुरुषार्थ’ या बद्दल अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले.

कर्मामुळे आपण अथवा व्यक्तित बिघाड होतो. त्यावर उपाय निरनिराळ्या पद्धतीने करण्यात येतात. धर्म, उपवास, साधना, ध्यान, सेवा असे कोणते उपाय करावे ? काय तपस्या करावी याचा विचार करायला हवा. तुम्हाला आनंद प्राप्त करावयाचा असेल तर कर्म व धर्म या दोहोंमध्ये विवेक आणा. असा मोलाचा सल्ला आजच्या प्रवचनातून देण्यात झाला.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.